व्यायाम करा, निरोगी रहा

Story: स्वस्थ रहा मस्त रहा |
03rd February, 10:34 pm
व्यायाम करा, निरोगी रहा

आपलं शरीर निरोगी राहण्याठी आपण कोणता आहार घ्यावा, आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे इत्यादि काही विषय तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत वाचले आहेत. दिनचर्या हा शब्द सुद्धा वाचला असेल. परत एकदा आठवण करून देते ➡️ दिनचर्या म्हणजे आपण खूप वर्षे निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करायच्या हितकारक गोष्टी. सकाळी उठून दात घासणे, अभ्यंग करणे, आंघोळ करणे, योग्य पद्धतीने जेवणे इत्यादि  विषय आपण बघितले. अजून एक महत्त्वाची गोष्ट रोज करायची असते… ती म्हणजे व्यायाम.  

आणि या व्यायामाची एक चांगली गोष्ट अशी की, आपल्याला आवडेल तो व्यायाम प्रकार आपण करू शकतो. सायकल चालवणे, पोहणे, धावणे, दोरी उड्या मारणे, कुस्ती खेळणे, योगासने करणे, वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ खेळणे इ. 

व्यायाम रोज करण्याचे फायदे देखील पुष्कळ आहेत, ते पुढीलप्रमाणे - 

लाघवं - शरीर चपळ बनतं.

कर्मसामर्थ्यं - वेगवेगळी कामं करण्याची शरीराची ताकद वाढते.

दीप्तोऽग्निः - भूक वाढते, पचन सुधारते.

मेदसः क्षयः - शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते.

विभक्तघनगात्रत्वं - शरीर अवयव पिळदार आणि सुडौल दिसतात.

व्यायाम केल्याने घाम येतो आणि शरीरातील अनावश्यक घटक घामावाटे बाहेर टाकले जातात आणि आपण व्यायाम न करता फक्त मोबाईल घेऊन सोफ्यावर दिवसभर पडून राहिलो तर मात्र वरील फायदे आपल्याला मिळणार नाहीत; उलट पचनशक्ती मंद होईल, चरबी वाढायला लागेल, शरीर जड वाटू लागेल आणि आपलं शरीर अनेक रोगांचं घर बनेल. 

चला तर मग मोबाईल बाजूला ठेवून, लगेच व्यायामाला सुरुवात करुया. पण हं, किमान ३ तास आपण काही खाल्लेलं नसावं.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य