कंटाळ्याचा कंटाळा

Story: छान छान गोष्ट |
28th January, 03:00 am
कंटाळ्याचा कंटाळा

टिंग टाँग टिंग टाँग!!

सायूने वाळिंबे आजीच्या दाराची बेल वाजवली. वाळिंबे आजोबांनी दार उघडलं. "अरे वाss!!! सायूबाई, आज इकडे काय महत्त्वाचं काम काढलंत?" "काम किनई आजीकडे आहे. आजी, अगं आमच्या शाळेतून बघ हा कागद दिला आहे. यात किनई प्रत्येक शेजाऱ्याची सही आणि त्याच्याकडनं ठराविक पैसे आणायचेत."

"हात्तिच्या, एवढंच ना. आण तो माझा सदरा इकडे, वीसाची कोरी नोट देतो तुला." आजोबा म्हणाले. 

"नाही हं आजोबा."

"अगं नको का म्हणतेस. शाळेने मागितलेत नि ते देताहेत तर घे की. आजीकडनं घेतले काय नि आजोबांकडनं घेतले काय सारखेच." गहू पाखडतापाखडता आजी म्हणाली. "आजीआजोबा, आधी ऐका माझं. या कागदावर वरती काय लिहिलय बरं! 'माझ्या कामाचा मोबदला' आजोबांनी चष्मा न लावताही ती ठळक अक्षरे वाचली.

"बरोबर. मला नं तुम्ही काहीतरी काम सांगा मग मी ते काम केलं की मला कामाचा मोबदला द्या."

"चल मग माझा चष्मा शोधून दे."

"हा काय आजोबा तुमच्या डोक्यावरच तर आहे." सायू खिदळली. "अगो, हे असेच वेंधळे पण तुला आता काम देऊ कुठचं! सखूबाई येऊन सगळी झाकपाक करून गेली. मटारच्या शेंगा सोलायच्या होत्या त्याही सोलल्या यांनी. निम्मे दाणे डब्यात न् निम्मे पोटात."

"कामाचा मोबदला." आजोबा हसत उत्तरले तशी सायूही फिसकन हसली. आजी दुखरी कंबर दाबत उठली नि आतल्या खोलीत दळणाची पिशवी आणायला गेली नि करवादू लागली, "पंच्याहत्तरी पार पडली तरी शिस्त म्हणून नाही. काय हे कपड्यांचे बोळे केलेत. आताच नीट लावून गेले होते मी." आजोबा ओशाळले, "अगं माझा मफलर मिळत नव्हता. तो शोधण्यासाठी जरा वरचं खाली."

"नि खालचं वर, "आजोबांच बोलणं मधेच तोडत सायू खिदळली. 

"बघतच रहा आता मी कशी कपड्यांच्या नीट घड्या करून ठेवते ते." असं म्हणत सायूने साऱ्या कपड्यांच्या नीट घड्या केल्या. मग तिने आजोबांच्या मेजाकडे मोर्चा वळवला. त्यांची औषधं नीट ओळीत लावली. पुस्तकं एकावर एक रचून ठेवली. आजीला दळणाच्या पिशवीत गहू भरायला मदत केली नि खालच्या लखनभैयाच्या चक्कीवर गहू दळायला ठेवूनही आली. आजीने सायूच्या गालांवरून कौतुकाने हात फिरवला व तिला बेसनाचा लाडू खायला दिला. तिच्या हातावर पाच रुपये ठेवत म्हणाली, "ही घे ह्या तुझ्या कामांची कमाई."

"अगं, पण आजी हे मी मोबदला मिळावा म्हणून थोडीच केलं!"

"तेही खरंच पण शाळेत पैसे द्यायचेत नं मग घे," आजीने बळेबळेच तिच्या तळहातात पैसे कोंबले. सायूने आजीचं नाव विचारलं व लिहिलं... निलांबरी वाळिंबे... आजीकडे कपड्यांच्या घड्या केल्या. गहू दळायला टाकले... पाच रू. मोबदला... पुढे आजीची सही घेतली. इतक्यात सायूची आई आली, "सायू, कुठे फिरते आहेस तू! रोज दुपारी मला छळत असतेस, कंटाळा आला कंटाळा आलाची टेप माझ्या कानाशी लावून." "अगं आई, आज नं मला कंटाळ्याचा कंटाळा आलाय. मी जाते बाजूच्या बसवतकर काकूंकडे, काही काम मिळतं का ते बघायला. तू बस बोलत." असं म्हणत सायू बसवतकर काकूंकडे जायला निघालीसुद्धा. सवतकर काकूंना माळ्यावर चढून त्यांच कोनात ठेवलेलं शिंकाळं काढून देणे, दुसऱ्या मजल्यावरच्या वरुण काकाला गाडी धुवायला मदत करणे, बनसोडे आजींना हाताला धरून बागेत नेणे, परत आणून सोडणे, पितळे काकूच्या पोलक्याची शिवण उसवून देणे... अशी आणि बरीच कामं सायूने आठवडाभरात केली. आठवड्याशेवटी सायूची कष्टाची कमाई झाली, एकूण बाहत्तर रुपये.

सायूने सगळ्या नोटा नीट सारख्या करून एकावर एक ठेवल्या व दुसऱ्या दिवशी शाळेत बाईंकडे घेऊन गेली. मुलांनी कष्टाच्या कमाईतून सहा हजार चारशे पासष्ट रुपये जमवले ज्यातून शाळा एका आश्रमशाळेला मदत करणार होती. 

भातसे बाईनी मुलांना विचारलं, "मुलांनो, कसं वाटलं तुम्हाला हे काम करताना?"

प्रत्येकाने आपापले अनुभव सांगितले. राजन एका घरी काम मागायला गेला तर त्या काकांनी म्हणे काही कामबिम मिळणार नाही म्हणत दार लावून घेतलं. सखाराम वाण्याने मात्र त्याच्याकडून तीळाचे लाडू छोट्या पाकिटांत भरून, ती पाकिटं जळत्या मेणबत्तीवर बंद करून घेतली. राजन म्हणाला, "मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं." मनिषा म्हणाली, "आपण कुणाच्यातरी उपयोगी पडलो याचं समाधान मिळालं."

योगिता म्हणाली, "सापटे काकूंच्या बंड्याला पाढे शिकवता शिकवता माझ्या पाढयांची चांगलीच उजळणी झाली." "सायली तुझं काय?" बाईंनी विचारताच सायली म्हणाली, "बाई, मला हा उपक्रम खूप म्हणजे खूपच आवडला. मी ठरवलंय फक्त उपक्रमासाठीच नाही तर दररोज फावल्या वेळात मी आजूबाजूच्या काकी, मामी, आजी-आजोबांची कामं करून देणार. कोणाला देवळात जायला सोबत हवी असते, तर कुणाचं काही हरवलेलं सापडत नसतं, कुणाला एकटंएकटं वाटत असतं तर कुणाला वरती चढून काहीतरी काढून हवं असतं, ही कामं करताना समाधान मिळतं." "तेच मोलाचं बरं का मुलांनो. दुसऱ्याला केलेल्या मदतीतून मिळणारं समाधान अमूल्य असतं." बाई सर्व मुलांना उद्देशून म्हणाल्या.

"आणि एक बाई, मला नं असं काम करताना कंटाळा नै येत, उलटपक्षी कंटाळ्याचाच कंटाळा येतो." "शाब्बास," म्हणत बाईंनी सायूचं कौतुक केलं.


गीता गरुड