२०२३ : लक्ष्यवेधी महिला

'तू चाल पुढं'च्या प्रवासात सिंहावलोकन करताना यंदाच्या गोव्यातल्या काही लक्ष्यवेधी महिलांचा वेध घेऊयात...

Story: तू चाल पुढं |
30th December 2023, 03:13 am
२०२३ : लक्ष्यवेधी महिला

पौर्णिमा राजेंद्र केरकर

गोव्याच्या प्रतिभावान लेखिका पौर्णिमा केरकर या गोमंतकीय साहित्याचा गाढा अभ्यास आणि संशोधनात्मक कार्य करत आहेत. गोव्याची लोककला, लोकसाहित्य, लोकसंस्कृती जतन आणि संवर्धित करणारा ‘माझिया अंगणात सये’ हा नाट्यमय प्रवास त्यांनी लिहून त्याचे सादरीकरण त्यांनी केवळ गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही केले. गोव्यातील परंपरागत रितीरिवाज, पारंपारिक सण, खेड्यातील लोकसंस्कृती, फुगडी, धालो, जात्यावरच्या ओव्या याचबरोबर गोव्यातील काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या लोककला, लोकसंस्कृतीचे दर्शन या नाट्यप्रवासात होते. मंगळवेढा येथे झालेल्या विभागीय साहित्य संमेलनात नुकताच हा कार्यक्रम सादर झाला. त्यावेळी माजी शिक्षणमंत्री श्री. लक्ष्मणराव ढोबळे यांनी या कार्यक्रमाचे खास कौतुक केले. गोव्यात आणि गोव्याबाहेरील राज्यातही या कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.

निवेदिता चन्द्रौजी

गेली २१ वर्षे नाट्यकलेसाठी वाहून घेतलेल्या निवेदीता चन्द्रौजी यांना कला आणि संस्कृती खात्यातर्फे यावर्षीचा प्रतिष्ठीत सृजन पुरस्कार अर्थात नवसर्जन चेतना पुरस्कार प्राप्त झाला आहे. निवेदीता यांनी अनेक नाट्यस्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. पहिली भूमिका त्यांनी ‘सिंहगड’ या नाटकात अवघ्या सोळाव्या वर्षी केली. गोवा राज्यातील राज्यस्तरीय नाटके तसेच संगीत नाटकांतही त्यांनी अनेक भूमिका वठवल्या. मदनाची मंजिरी, ययाति देवयानी, संगीत मानापमान, पुण्यप्रभाव यातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले. केवळ गोव्यातच नव्हे, तर परदेशातही त्यांच्या नाटकांचे प्रयोग झाले असून, परदेशातही त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. दुबईच्या महाराणीच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता.

दिया सावळ

संयुक्त अरब अमीरातीमधील अल-ऐन ईथे झालेल्या २५व्या आशियाई युवा बुद्धीबळ स्पर्धेत १० वर्षाखालील मुलींच्या स्टँडर्ड आणि ब्लीट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सांघिक सुवर्णपदक पटकावून चिमुकल्या दिया सावळने गोव्याचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले आहे. दियाने २०१९ साली दिल्ली येथे झालेल्या सहा वर्षांखालील मुलींसाठी असलेल्या पश्चिम एशिया बुद्धिबळ स्पर्धेत ३ सुवर्णपदकांची प्राप्ती करत बाजी मारली होती. रॅपिड, स्टँडर्ड आणि ब्लीट्झ स्वरुपात तीन सुवर्णपदकांची प्राप्ती करणारी ती एकमेव खेळाडू ठरली होती. याशिवाय २०२२ साली श्रीलंका येथे झालेल्या १६व्या आशिया शालेय बुद्धिबळ स्पर्धेत दियाने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची लयलूट केली होती. दियाने लहानपणापासूनच गोव्यात आणि गोव्याबाहेरील इतर अनेक स्पर्धेत पदके मिळवण्याचा धडाका कायम ठेवला आहे.

दिशा नाईक

क्रॅश फायर टेंडर चालवणारी भारताची पहिली प्रमाणित महिला अग्निशामन फायटर म्हणून दिशा नाईक हिचे नाव नोंदवले गेले आहे. एअरोड्रम रेस्क्यू ऍण्ड फायर फायटिंग युनिटमध्ये सहभाग असलेली ती पहिली भारतीय महिला आहे. तामिळनाडू येथे दिशाने सहा महिन्यांचे अतिशय कठीण असे प्रशिक्षण घेऊन यात प्रावीण्य मिळवताना यातील कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त केले. सुरवातीपासून धाडसी असलेल्या दिशाने हे प्रशिक्षण सहज पूर्ण केले. ज्या क्षेत्रात आजही पुरुषांच्या तुलनेत केवळ २० टक्के महिला कार्यरत आहेत, तिथे पेडण्याच्या दिशाने मिळवलेले हे यश आणि तिची कामगिरी निश्चितच प्रेरणादायी मानली जात आहे. दिशा सध्या मनोहर पर्रीकर इंटरनॅशनल विमानातळावर आपली ड्यूटी निभावत आहे.

डॉ. स्नेहा भागवत

गेली वीस वर्षे स्नेहा भागवत आयुर्वेदाशी निगडीत कार्य करत असून आज त्यांची आयुर्वेद तज्ञ अशी गोव्यातच नव्हे तर परदेशातही ओळख आहे. परदेशातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचार घेत असून मॉस्को, अमेरिका आदी ठिकाणी त्यांची भागीदारीत क्लिनिक चालू आहेत. ‘रोटरी क्लब ऑफ मडगाव सनराईज’च्या त्या अध्यक्षा असून या माध्यामाद्वारे त्या जनतेची सेवा करत आहेत. ‘ऊर्जा वेलनेस सेंटर’तर्फे आयुर्वेद, सौंदर्य आणि योगसंबंधित शिक्षण व सेवेचे कार्य अविरतपणे चालू आहे. महिलांचे आणि बालकांचे आरोग्य, महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यानची स्वच्छता यासाठी त्या समाजात जागरूकता निर्माण करत आहेत.

मेजर नेहा साळकर 

डिचोलीची नेहा सुधीर साळकर ही श्री शांतादुर्गा हायस्कूल, बिचोलिमची विद्यार्थिनी. नववीत असताना नेहा एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कॉर्प्समध्ये सामील झाली आणि तिने तिथे सर्वोच्च पुरस्कार जिंकला. त्यानंतर २००९ मध्ये नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तिची निवड झाली. नेहाने बेलगावी, बेंगुलुरू, नवी दिल्ली आणि देशातील इतर ठिकाणी लष्करी प्रशिक्षण घेतले. आपल्या प्रशिक्षण कार्यकाळात नेहाने प्रत्येक प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर तिने त्याच वर्षी ४ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण मॉड्यूलसाठी आपले नाव नोंदवले. अतिशय खडतर असे हे प्रशिक्षण संपल्यावर नेहाने संरक्षण बटालियनमध्ये लेफ्टनंट म्हणून पदभार स्वीकारला. कालांतराने पदोन्नती होत ती मेजरही झाली. देशावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि प्राणपणाने देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या नेहाचे हे यश, तिची जिद्द, चिकाटी आणि आजवरच्या कठोर मेहनतीला मनापासून सलाम!

तन्वी कामत बांबोळकर

साहित्य अकादमीचा २०२३ या वर्षासाठी युवा पुरस्कार डॉ. तन्वी कामत बांबोळकर यांच्या ‘शॉट’ लघुकथा संग्रहाला मिळाला. गेल्या दोन दशकांपासून लिहित असलेल्या तन्वीने तिच्या वाढदिवसानिमित्त 'पावली', 'शॉट्स', 'लॉगआउट' आणि 'अनवाणी' या चार पुस्तकांचे प्रकाशन केले. तिने गोवा विद्यापीठात ‘फोक थिएटर इन गोवा’ या विषयावर इंग्रजीमध्ये डॉक्टरेट पूर्ण केली आणि पीएचडी केल्यानंतर ती गोव्याच्या लोककलेच्या विविध पैलूंवर संशोधन आणि दस्तावेजीकरण करत आहे. तिने इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्ससाठी ‘पैंगीणचो कालो’ या प्रकल्पावर काम केले आहे. तिने अनेक मुलांच्या पुस्तकांचे भाषांतर केले आणि कोकणी भाषा मंडळ आणि प्रथम बुक्स स्टोरीवीव्हर सारख्या ई-प्लॅटफॉर्मवर प्रकाशित केले आहे आणि ऑल इंडिया रेडिओ, पणजी येथे वृत्त वाचक आणि अनुवादक म्हणून काम केले आहे. कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेत ‘लॉगआउट’ या स्क्रिप्टसाठी तिला प्रथम पारितोषिक मिळाले.


  • कविता अमोणकर
  • पत्रकार, लेखिका, कवयित्री