यंग स्टार्सचा ५ गडी राखून विजय

नंदा लोलयेकर ट्रॉफी : बनारामन मडगावचा पराभव

Story: प्र‌तिनिधी। गोवन वार्ता |
03rd December 2023, 11:58 pm
यंग स्टार्सचा ५ गडी राखून विजय

काणकोण : माशे क्रिकेट क्लब, माशे काणकोण येथील निराकर मैदान दापोत, माशे मैदानावर झालेल्या ४२ व्या नंदा लोलयेकर ट्रॉफीच्या बनारामन मडगाव विरुद्ध यंग स्टार्स ऑफ मौल्ला यांच्यातील साखळी सामन्यात यंग स्टार्स ऑफ मौलाने ५ गडी राखून विजय मिळवला.

बनारामन मडगावने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बनारामनने ३१.१ षटकात सर्वबाद १५९ धावा केल्या. संघातील साजिद सय्यदने ४० चेंडूत ५० धावा तर कौशल सिंग २४ (३७), प्रणव कामत १८ (२०) धावा केल्या. 

यंग स्टार्सतर्फे साहिल धामशेकरने ५ षटकांत २० धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. सचिन कुलकर्णीने ५ षटकांत १७ धावा देेऊन २ गडी बाद केले. नागेश रेगेने ५ षटकांत २८ धावांच्या मोबदल्यात २ गडी टीपले. तर अभिनव यादव आणि संजय नाईक यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरात खेळताना यंग स्टार्स ऑफ मौलाने बनारामन संघाने दिलेले १६१ धावांचे लक्ष्य ३०.१ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यंग स्टार्सच्या विश्वनाथ रेगेने ७३ चेंडूत ६१ धावा केल्या. यश गडेकरने  (५९ धावा) विश्वनाथला चांगली साथ दिली. तर जयपाल मडाने १४ चेंडूत उपयुक्त ११ धावा केल्या. बनारामन संघाच्या साहिल नेनेकाने सर्वाधिक २० धावा देऊन ३ गडी बाद केले. तर सुब्रतो सरकारने एका षटकात ४ धावा देऊन २ गडी बाद केले.