सच्चिदानंदघन परमात्मा प्राप्तीचा संकल्प

सत् व असत् यांचा निवाडा विवेकच करू शकतो. म्हणून हा सत्-असत् विवेक व बुद्धी यांची प्राप्ती करून घेऊन त्यांच्या मदतीने मनाला इंद्रिय-सुखाभिलाषेच्या संकल्पातून बाहेर काढून सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या संकल्पांत गुंतवणे हे ध्येय बाळगायला हवे.

Story: विचारचक्र |
03rd December 2023, 11:28 pm
सच्चिदानंदघन परमात्मा प्राप्तीचा संकल्प

मन ही जीवाची शक्ती आहे. जीव हा परब्रह्माचा अंश असतो. म्हणून मनाच्या संकल्पाची शक्ती अफाट, अचिन्त्य असते. संकल्प, तो कुठलाही असो, त्याचा त्यानुसार परिणाम हा असतोच असतो. इंद्रियसुखांचा संकल्प असेल तर ती सुखे मिळतात. पण ती मिळवण्यासाठी जी कर्मं हातून घडणे क्रमप्राप्त असते ती घडल्यामुळे दु:ख वाट्याला येणे हे ही अपरिहार्य असते. म्हणजे एक तर इंद्रियसुखे ही शाश्वत नसतात आणि शिवाय ती अनेक प्रकारच्या दु:खांनी लिप्त असतात. आता  प्रश्न असा येतो की, अशी ही अशाश्वत व दु:खयुक्त सुखे हवीतच कशाला? बरोबर! नकोतच असली सुखे. मग काय हवे? तर दु:खमुक्त शाश्वत असे सुख हवे. तसे सुख उपलब्ध होऊ शकते का? हो! कुठे असते ते? ते असते त्या सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये. ते प्राप्त होणे शक्य आहे का? हो. आहे. कसे? मनाच्याच माध्यमातून. म्हणजे कसे? तर मनाला त्या दु:खमुक्त शाश्वत सुखाच्या प्राप्तीचा संकल्प करायला लावून. मग करावे ना तसे!

हो करावेच. पण त्या आधी जीवाचे हे मन इतका अनंत काल ओढाळ गुरांप्रमाणे जे अशाश्वत दु:खयुक्त ऐंद्रीयसुखात गुरफटलेले असते तिथून त्याला हळूहळू पूर्णपणे ओढून काढून बाजूला करणे आवश्यक आहे आणि हेच नेमके मोठे कठीण कर्म आहे. पण तसे ते करून मगच त्याला शाश्वत सुखाच्या संकल्पांत गुंतवायला लागते! यातला खोडा असा विचित्र आहे की इंद्रियसुखाच्या गोडीपेक्षा आपल्या परमात्मस्वरूपाशी एकरूप होऊन राहण्यातली गोडी अनंत पटींनी अधिक आहे, हे मनोमन उमगल्याशिवाय माणसाचे मन इंद्रियसुखातून बाहेर येत नाही; इंद्रियसुखातून नि:शेष बाहेर पडल्याशिवाय परमात्मस्वरूपाशी एकरूप होण्याच्या वाटेवरून चालायला मन धजावत नाही आणि मनाला इंद्रियसुखाच्या डोहातून ओढून बाहेर काढणे हे अत्यंत कठीण कर्म आहे. मग परमात्म्याच्या एकरूपतेची गोडी कळणार कशी? कारण शाश्वत सुखाची गोडी कळण्याइतपत तरी त्या सुखाची ओळख व्हायला हवी. ते करण्याचा एक उपाय म्हणजे या ६ व्या अध्यायाच्या २७ व्या श्लोकापर्यंत सांगितलेला ध्यानमार्ग आणि तो जर असाध्य वाटत असेल तर दुसरा सुगम सोपा उपाय भगवंतांनी या २९ व ३० श्लोकांमध्ये सांगितला आहे.

मन शक्तिमान आहे. त्याला वेसण घालणे कठीण आहे. पण बुद्धी ते काम करू शकते. बुद्धीला दिशादर्शन करण्याचे काम विवेक करतो. सत् व असत् यांचा निवाडा विवेकच करू शकतो. म्हणून हा सत्-असत् विवेक व बुद्धी यांची प्राप्ती करून घेऊन त्यांच्या मदतीने मनाला इंद्रिय-सुखाभिलाषेच्या संकल्पातून बाहेर काढून सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या संकल्पांत गुंतवणे हे ध्येय बाळगायला हवे. आपल्याला जाणवणारे हे जे काही तमाम जगत् आहे ते सगळे त्या सच्चिदानंदघनाच्या ठायीच आहे आणि हाच सच्चिदानंदघन त्या सर्व जगताच्या ठायी ओतप्रोत भरलेला आहे हे विवेकाने समजून घेऊन  बुद्धीचाही तसाच निश्चय व्हायला हवा आणि असा निश्चय करणे हे तुलनेने सोपे  आहे.

सर्व भूतांमध्ये (म्हणजे वस्तूंमधे) एकमात्र वासुदेव म्हणजे सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्माच ऐक्य-भावाने अभिन्नपणे वसतो अशी ज्याची दृढ श्रद्धा आहे आणि त्या सगळ्या वस्तू कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्याबद्दल वेगळेपणाचा भाव ज्याच्या अंतरी कधीही उपजत नाही आणि अशा रीतीने परमात्म्याचे सर्वत्र पूर्णपणे भरून असलेले एकत्व जो दृढपणे जाणतो, तो त्या परमात्मास्वरूप वासुदेवाशी (रामरूपी अंतरात्म्याशी) सर्वत: पूर्णपणे एकरूप असतो. श्रीकृष्ण म्हणतात की, हे मी एरव्ही जरी बोलून दाखवले नाही, तरीही तेच सत्य आहे. दिव्याचा प्रकाश आणि दिवा हे दोन्ही जसे एकरूप असतात, जसे अवकाश व आकाश हे एकरूप असतात, जसे पाणी व ओलावा एकरूप असतात, तसाच हे अर्जुना, तो पुण्यवान पुरुष माझ्याशी एकरूप असतो. कारण तो 'मला' सर्वत्र पाहतो आणि सर्व काही 'माझ्यात'  पाहतो.

श्रीमत् आद्यशंकराचार्यांनी यासाठी भक्ती आणि योगज्ञान या दोहोंच्या अनुरूप मिश्रणाचा पुरस्कार केला आहे. योगज्ञानी भक्त परमात्म्याला कधी अंतरत नाही म्हणजे दृष्टिआड करत नाही. विसंबत नाही. त्याचे अंत:करण परमात्म्याशी पक्के जोडले गेलेले असते. कोणत्याही देश, काल परिस्थितीमुळे त्याच्या अंत:करणातील ईश्वरभाव नष्ट होत नाही.

हनुमंताच्या रामभक्तीचा एक प्रसंग आहे. त्यांना एकदा एकाने विचारले 'आज कोणता वार आहे?' त्यावर हनुमंत म्हणाले 'आज रामवार आहे.' विचारणाऱ्याला वाटले हा भानावर नाही. 'आज तिथी कोणती आहे?' त्यावर उत्तर आले  'रामतिथी आहे.' त्यावर त्या माणसाने विचारले 'आज नक्षत्र कोणते आहे?' उत्तर आले 'राम नक्षत्र आहे.' तो म्हणाला 'रामवार, रामतिथी, रामनक्षत्र हे कुठेच सांगितलेलं नाही.' त्यावर हनुमान म्हणतात, 'बाबा रे, मी वार, तिथी, नक्षत्र काहीच जाणत नाही, मी फक्त एक रामच जाणतो.'

योगज्ञानी भक्त परमात्म्याला आपल्या अंत:करणातून कधीही अंतरत नाही.

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थित:।

सर्वथा वर्तमानोsपि स योगी मयि वर्तते ।।३१।।

सरळ अर्थ :  जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व भूतांचे ठिकाणी आत्मरूपाने असलेला जो सच्चिदानंदघन वासुदेव अशा मला भजतो तो योगी सर्व प्रकाराने वर्तत असला तरी माझ्या ठिकाणीच राहतो. कारण त्याच्या अनुभवात, जाणिवेत माझ्याशिवाय दुसरे काहीच असत नाही.

विस्तृत विवेचन : जसे वस्त्र हे तंतूंचे बनलेले असते, सोन्याचे दागिने कितीही वेगवेगळ्या स्वरूपाचे असले तरी त्या सगळ्यांचे अधिष्ठान जसे सोनेच असते, एखाद्या झाडाला कितीही असंख्य पाने असली तरी त्या सगळ्या पानांमध्ये त्या वृक्षाचाच वास असतो, त्याचप्रमाणे सर्व ज्ञाताज्ञात विश्वामधे मीच एक परब्रह्म परमात्मा वासुदेव भरून राहिला आहे, अशी अढळ श्रद्धा स्वानुभवाने ज्याच्या मानसात विराजमान असते, तो जरी देहधारी असला तरी माझ्याच योग्यतेचा आहे. ऐक्यबोधाची अशी अद्वैत स्थिती भारतीय समाजाला त्यांच्या विविध संतांमध्ये त्या त्या काळी प्रत्यक्ष पहायला व अनुभवायला मिळालेली आहे.

मिलिंद कारखानीस,

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३