वीज मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी : लोकप्रतिनिधींमध्येही रोष
केपे : केपे पालिका क्षेत्राबरोबरच आजूबाजूच्या पंचायतीत गेल्या काही महिन्यांपासून वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक हैरणा झाले आहेत. केपे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी याबाबत वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते मात्र ही समस्या आजही ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
केपे वीज कार्यालय हे केपे, कुडचडे, सांगे व कुकळ्ळु अशा चार मतदारसंघातील काही भागांना जवळ असून शेल्डे व कुयणामळ असे दोन सब स्टेशन येथे आहेत. शेल्डे सब स्टेशनवरून केपे पालिका क्षेत्र शेल्डे, असोल्डा, आवडे, पारोडा, आबावली तर कुमणामळ सब स्टेशनवरून रिवण, कावरेपिला, मळकर्णे, सुळकर्णे या भागात वीज पुरवठा केला जातो. तसेच पालिका क्षेत्रातील मुख्य बाजार ते इम्रामळ पर्यंत भाग भूमीगत वीज वाहिनी टाकण्यात आली आहे.
काही भागात रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणाने झाडे असल्याने वीज पुरवठा करण्यात कर्मचाऱ्यांना अनेकवेळा समस्या जाणवत असते. पावसाच्या दिवसांत वीज पुरवठा होण्यात वारंवार खंड पडत असे मात्र आता पावसाळा उलटून गेला तरी वीज समस्या काही केल्या सुटत नाही. दिवसातून दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे सामन्या नागरिकांबरोबरच पालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनाही याचा नाहक फटका बसत आहे.
वीज खात्याचे कार्यालय केपेत असले तरी वीज पुरवठा शेल्डे व कुयणामळ भागातून केला जातो. अशा वेळी लाईन ट्रीप होणे, चेज आउट होणे अशा विविध कारणांमुळे विद्युतपुरवठा खंडित होतो. काही दिवसांपूर्वी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी वीज कार्यालयात जाऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती मात्र तरीही हा प्रश्न अजून सुटला नाही.
गेली अनेक वर्षे केपेत वीज खंडित होण्याचे प्रकार सुरुच आहेत. आजही या पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी जुन्या विद्युत वाहिन्या आहेत व हे देखील वीज खंडित होण्यात प्रमुख कारण बनत आहे. आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्यास ही वीज समस्या सुटू शकते. वीज मंत्र्यांनी यात लक्ष घालून ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी केपे सिटीझन समितीचे अध्यक्ष आझीम शेख यांनी केली.
वारंवार होणाऱ्या या वीज खंडित प्रकरणांमुळे स्थानिकांसह लोकप्रतिनधींमध्येही नाराजी पसरली आहे. या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लवकरात लवकर सरकारने यावर उपाय काढून त्वरित ही समस्या दूर करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.