ज्योति कलश छलके

सूर्योदय म्हणजे दिवसाची सुरुवात. उषा, प्राची, सकाळ, पहाट, प्रभात, रामप्रहर अशा अनेक नावांनी आपण ओळखतो. हा निसर्ग नियमाचा एक भाग असला तरी त्याच्या मांगल्याने तो सोहळा पवित्र वाटतो. अगदी लहानपणापासून आपण चित्र काढताना दोन डोंगर त्याच्यामधून उगवणारा सूर्य हे काढायला शिकतो. सूर्याचा गोळा त्याच्या किरणांसह आणि मध्येच पक्ष्यांची व्ही आकाराची माळा असं ठराविक चित्र काढतो तो आपल्या पाहण्यातला सूर्योदय असतो.

Story: ललित |
01st December 2023, 10:38 pm
ज्योति कलश छलके

दिवसभराच्या चोवीस तासांचे आठ प्रहर कल्पिले आहेत. त्यातला पहिला प्रहर म्हणजे सूर्योदयाचा काळ. हा सात्विक स्वरूपाचा मानला जातो, म्हणूनच मनाला प्रसन्नतेची, मंगलतेची, पावित्र्याची अनुभूती येत असते. रात्रभरासाठी पाहुणा म्हणून आलेला अंधार आपला गाशा गुंडाळून परतीच्या प्रवासाला लागतो. आकाशाच्या मंचावर रात्रपाळी करून थकलेल्या चांदण्याना पेंग येऊ लागते, त्या थकून, मलूल होऊन घराकडे परतू लागतात.  

हळूहळू सर्व चराचर हलकेच निद्रेतून जागे होऊ लागते. नव्या दिवसाची सुरवात ‘तम विरते, रात सरते’ अशी होते. मंद पहाट वारे झुळझुळत येतात, प्राजक्ताचे तरु मोहरून धरतीच्या अंगणी फुलांचा सडा पाडू लागतात. अशी ही रम्य बेला असते. प्रहर पहिला नित्यनेमाने अविरत येतो, भूपाळीचे स्वर गुणगुणतो, अशा वेळी आपल्या मनाचा अरुणही हर्षात रंगतो, जणू पूर्वेच्या लोचनी पृथ्वीवरचा स्वर्ग हसत असतो, प्रत्येक दवबिंदू सूर्य किरणांच्या तेजाने सोन्यापरी उजळून निघतो अशी चराचरावर प्रभात रंगाची जादू पसरलेली असते. 

धुक्याची तलम ओढणी सावरत घेऊन उषा राणी निघायच्या तयारीत असते. अरुणोदयाचा हर्ष साजरा करायला पक्षी किलबिल करू लागतात. सूर्याचे पहिले किरण धरतीवर अवतरले ती वेळ म्हणजे वाऱ्याने बासरीतून सुंदर पहाट धुन छेडावी अशी नादमय असते. 'प्रभाती सुर नभी रंगती दश दिशा भूपाळी म्हणती' याचे प्रत्यंतर देणारी असते. अद्भुत अलवार कोमल अशी ही पहाट बेला सर्वानाच हवीहवीशी वाटणारी असते. 

खरी पहाटेची प्रचिती येते ती पंडित नरेंद्र शर्मा यांच्या कवितेवर सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या 'ज्योति कलश छलके' या गीतातून. त्यांनी सूर्याला ज्योति कलश म्हंटले आहे. एका कलशात प्रकाशमय ज्योति भरून त्याचा उजेड, त्याचं ओसंडून वहाणं ही कल्पनाच कीती सुंदर आहे. अमृताचे सिंचन करणारा हा मंगल घट  कलंडून सगळ्या चरचरावर त्याची पखरण झाली आहे. त्याचे तुषार प्राशन करून धरतीचे मुख उजळून निघाले आहे. उषदेवीने आपला पदर पसरून सर्वत्र सुखाची छाया पसरवली आहे. सर्व अंबरात गुलाली कुंकुम सांडावे अशी गुलाबी लाल सूनहरे रंग मिसळून ढग रंगपंचमी साजरी करत आहेत. 

ही कल्पना उषासूक्त या ऋग्वेदातील कल्पनेशी मिळती जुळती आहे. उषा ही जीवनाचा आधार आहे अंधार अराजकता अज्ञान दूर करते ती खरी पहाट आणि तोच खरा सूर्योदय. ती पहाट बेला धरतीवर सुख छाया प्रदान करू शकते. या गीतात ज्योति यशोदेची उपमा धरती गाय अशी उपमा दिली आहे आणि नील गगन म्हणजे आकाश हा बाळ कन्हैय्या आहे. ज्याच्या अमृतमय वर्षावाने सारी धरती तृप्त होते. 

रात्रभराच्या काळोखाला आपले डोळे सरावलेले असतात अशा वेळी एकदम प्रखर उजेड सहन होणार  नाही म्हणून सूर्यदेव सुरवातीला सौम्य स्वरूप धारण करीत पृथ्वीवर येत असावा, हळूहळू त्याची दाहकता तो वाढवतो. मध्यान्ह पर्यन्त तो चांगलाच तापलेला असतो. परत दुपार कलायला लागली की त्याची तीव्रता कमी होते. संध्या समयी तो शांत होत आपल्या घरी परततो. 

प्रभात काळ ते संध्या काळ हा एखाद्या भरभराटीला वर चढत जाणाऱ्या उद्योजकासारखा तेजस्वी असतो तर संध्याकाळपर्यन्त तो थकलेल्या पुरुषा सारखं हळूहळू जात आपला निरोप घेत असतो. पण पहाटेचा तो स्वत:ही फ्रेश ताजातवाना वाटत असतो आणि त्याच्या आगमनामुळे आपल्यालाही एक ताजेपणा प्रदान करतो. आणि मुखातून अवचित शब्द बाहेर पडतात. 

आजी सोनियाचा दिनु|वर्षे अमृताचा घनु|| 


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.