ध्रुवीय विज्ञान होणार अधिक सोपे

एनसीपीओआरने काढले विशेष कॉमिक बुक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st December 2023, 12:42 am
ध्रुवीय विज्ञान होणार अधिक सोपे

पणजी : जटिल ध्रुवीय विज्ञान विद्यार्थ्यांना समजावे यासाठी वास्को येथील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रातर्फे (एनसीपीओआर) कॉमिक बुक काढण्यात आले आहे. हे पुस्तक कोकणी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत असून ते लवकरच मोफत ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुस्तकात संस्थेतर्फे केले जाणारे शास्त्रीय काम सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे.
पुस्तकाची संकल्पना तसेच लेखन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ रविदास नाईक व डॉ.अभिलाष नायर यांनी केले आहे. पुस्तकात अंटार्क्टिका, अार्क्टिक येथील बर्फाचा अभ्यास, येथील तळ्यांचा अभ्यास, अंटार्क्टिका महासागरातील जीवशास्त्राचा अभ्यास, केंद्रातर्फे अंटार्क्टिकामध्ये केले जाणारे विविध प्रयोग, जागतिक तापमावाढीमुळे या ध्रुवांवर होणारे परिणाम असे विविध धडे सहज भाषेत समजावून सांगितले आहेत. शास्त्रीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य व्यक्तीला देखील हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
या शिवाय पुस्तकातून हजारो वर्षे बर्फाच्या थरात अडकलेल्या हवेच्या बुडबुड्यावरून त्या काळातील वातावरणाचा अभ्यास करणे, अंटार्क्टिकामधील तळ्याच्या अभ्यास करून हवामान बदलाची माहिती मिळवणे, अंटार्क्टिकावरील भारताच्या मैत्री आणि दक्षिण गंगोत्री या केंद्रांवर चालणारे काम, यासाठी करण्यात येणाऱ्या विशेष अभ्यास मोहिमा, दक्षिण महासागरातील ‘फायटोप्लांकटन' हे सूक्ष्मजीव, अार्क्टिक ध्रुवावरील शास्त्रीय अभ्यास सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत ध्रुवीय प्रदेश अतिशय संवेनशील बनले आहेत. या प्रदेशांचा पृथ्वीच्या हवामानाशी थेट संबंध आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. कॉमिक बुक हे लोकांमध्ये या प्रदेशांविषयी जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा एनसीपीओआरतर्फे केली जात आहे.            

हेही वाचा