दिग्गज खलनायक म्हणतात, शिवीगाळ, नग्नता नको!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th November 2023, 12:04 am
दिग्गज खलनायक म्हणतात, शिवीगाळ, नग्नता नको!

अभिनेते किरण कुमार, रझा मुराद, गुलशन ग्रोवर व रणजीत. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : कधी काळी रूपेरी पडद्यावर महिलांवर अत्याचार करणारे, खून करून दरोडे घाणारे खलनायक आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजमध्ये शिवीगाळ तसेच नग्नता नको, असे मत व्यक्त करत आहेत. सोमवारी इफ्फीच्या ‘इन कॉन्व्हर्सेशन’ या सत्रात हिंदी चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारे रणजीत, किरण कुमार यांनी ही भूमिका मांडली. यावेळी गुलशन ग्रोवर आणि रझा मुराद हेही उपस्थित होते.
रणजीत म्हणाले की, सध्याच्या काळात वेब सिरीजची चलती आहे. मला त्यातील शिवागळ किंवा नग्नता आवडत नाही. मुळात ती आपली संस्कृती नाही हे समजून घेतले पाहिजे. अनेकदा गरज नसताना अशा गोष्टी त्यामध्ये घातल्या जातात. वर प्रेक्षकांना तेच आवडते असा चुकीचा युक्तिवाद केला जातो. तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही थेट पॉर्नोग्राफीच बनवा! मला देखील अशा वेब सिरीजची आणि चित्रपटांची ऑफर आली होती. मात्र त्यात अनावश्यक शिवीगाळ असल्याने मी ती ऑफर नाकारली. माझ्यावर वाईट दिवस आले आणि मी भुकेने मरत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तरीदेखील मी अशा वेब सिरीज स्वीकारणार नाही. तुम्ही जे चित्रपट स्वीकारता त्यामुळे भविष्यात स्वतःची स्वतःला लाज वाटू नये, अशी माझी भूमिका आहे.
किरण कुमार म्हणाले की, संहितेची किंवा पटकथेची गरज असेल तर शिवीगाळ किंवा नग्नता असायला हरकत नाही. मात्र केवळ जास्तीत जास्त प्रेक्षक मिळावेत म्हणून या गोष्टी करणे चुकीचे आहे. कुटुंबासोबत वेब सिरीज पाहताना त्यामध्ये काही अश्लील दृश्य आले, तर माझी मलाच लाज वाटते. माझ्या मुलीकडे किंवा मुलाकडे मी पाहू शकत नाही. शिवीगाळ ही समाजाची भाषा आहे असे सांगितले जाते. मला मात्र ते मान्य नाही.

व्हिलनमुळेच हिरोला महत्त्व!
रझा मुराद म्हणाले की, कोणताही चित्रपट असो कथा असो किंवा धार्मिक पुराण असो, त्यामध्ये एखादा व्हिलन असतोच. व्हिलन नसला, तर हिरो हिरोगिरी करू शकत नाही. त्यामुळे खरे पाहता व्हिलनमुळेच हिरोला महत्त्व आहे.

पाश्चिमात्य चित्रपटात व्हिलनही जिंकतो!
गुलशन ग्रोवर म्हणाले की, हिंदी चित्रपटात ‘सत्यमेव जयते’ला महत्त्व आहे. काहीही झाले तरी शेवटी हिरो व्हिलनवर मात करतो, असे दाखवले जाते. मात्र पाश्चिमात्य चित्रपटसृष्टीत अनेकदा व्हिलन जिंकलेला दाखवले जाते.

हेही वाचा