विकी कौशलचा 'चित्रपट' आता नेटफ्लिक्सवर गाजणार
🎬 ५९९ कोटींचा गड जिंकून 'छावा' आजपासून ओटीटीवर!
विकी कौशलचा 'छावा' आता नेटफ्लिक्सवर गाजणार! हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट 'छावा' १४ फेब्रुवारीला थिएटरमध्ये धडकला आणि बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता ही ऐतिहासिक गाथा ११ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्सच्या दिनेश विजन निर्मित या सिनेमात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंग आणि अशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत. नेटफ्लिक्सने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले, "आले राजे आले! शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची कहाणी आता तुमच्या स्क्रीनवर!"
🌟 काय म्हणाला विकी कौशल?
"छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणे हे माझ्या करिअरमधले सर्वांत सन्मानाचे आणि समाधानदायक काम होते. त्यांचा पराक्रम आणि वारसा देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचावा असे मला वाटते. नेटफ्लिक्समुळे ही गाथा भारतातच नव्हे तर जगभर पोहोचणार आहे," असे भावूक शब्दांत विकीने सांगितलं.
🎥 निर्मात्यांचाही भावनिक प्रवास
"'छावा' ही आमच्यासाठी केवळ फिल्म नाही, तर एक भावना आहे. ही शौर्यगाथा, त्याग, आणि परंपरेचा उत्सव आहे. आम्ही नेहमी अशाच कथा सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या मनाला भिडतात," असे निर्माता दिनेश विजन यांनी नमूद केले.
🏆 संगीत, अभिनय आणि रेकॉर्ड्सचा महासंगम!
चित्रपटात ए. आर. रहमान यांचे दमदार संगीत आणि इरशाद कामिल यांचे बोल प्रेक्षकांना भावून गेले. कथानक आणि अभिनयाने सगळ्यांचीच मने जिंकली. इतकेच नव्हे तर 'छावा'ने शाहरुख खानच्या 'जवान'लाही मागे टाकत बॉलीवूडमधील तिसरा सर्वात मोठा हिट ठरला आहे! भारतातच तब्बल ५९९ कोटींचा गल्ला तर वर्ल्डवाईड कलेक्शन ८०४ कोटींवर पोहोचले आहे.
चित्रपटाने थिएटरमध्ये 52 दिवसांचा काळ पूर्ण केला असून महाराष्ट्राबाहेर सुद्धा, विशेषतः तामिळनाडू सारख्या राज्यांमध्येही प्रचंड यश मिळवले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा हा अप्रतिम चित्रांकन आता तुमच्या घरी येत आहे - ११ एप्रिलपासून फक्त नेटफ्लिक्सवर!