सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा माझा सन्मान : मायकल डग्लस

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th November 2023, 12:03 am
सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा माझा सन्मान : मायकल डग्लस

पणजी : सत्यजित रे हे एकाच वेळी केवळ दिग्दर्शक, लेखक, एडिटर आणि संगीतकारही होते. त्यामुळे त्यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा माझा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया दोन वेळा ऑस्कर पुरस्कार विजेते आणि दिग्गज हॉलिवूड अभिनेते मायकेल डग्लस यांनी दिली.
सोमवारी इफ्फीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स याही उपस्थित होत्या. मायकल डग्लस म्हणाले, महाविद्यालयात असताना मी सत्यजित रे यांच्या ‘पथेर पांचाली’ आणि ‘चारुलता’सारख्या चित्रपटांचा अभ्यास केला होता आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही विशेष बाब आहे. चित्रपट समान भाषेची देवाणघेवाण करतात आणि आपल्याला एकमेकांच्या जवळ आणतात. चित्रपटांमध्ये काय चालले आहे हे जगभरातील प्रेक्षक समजू शकतात. चित्रपट आंतरराष्ट्रीय संपर्क निर्माण करतात. हीच या उद्योगाची जादू, सौंदर्य आणि आनंद आहे आणि म्हणूनच मला हा व्यवसाय खूप आवडतो
डग्लस म्हणाले, भारतीय चित्रपट सर्वत्र प्रसिद्ध आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचत आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय चित्रपट उद्योगासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. इफ्फीत ७८हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. ऑस्करमध्ये आरआरआरच्या यशाने भारतीय चित्रपट उद्योगाला असे अनेक मोठे चित्रपट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.