डेड सी…

समुद्र सपाटीपासून कितीतरी खोल असल्यामुळे ह्याचं पृथ्वीवरचा सर्वात खालचा किनारा म्हणून काय ते कौतुक. नाहीतर पाहण्यासारखं इथे काहीच नाही. माणूस इथे तरंगतो असं म्हणतात.

Story: प्रवास |
26th November 2023, 03:24 am

डेड सीच्या दिशेने गाडी चालली होती. आमचा ड्रायव्हर आम्हाला ‘प्रोमिस्ड लॅंड’ बद्दल सांगत होता. एका बाजूने वाडी मुजीब दिसत होतं. वाडी मुजीब म्हणजे जिला अर्नोन स्ट्रीम म्हणूनही ओळखली जाते ती जॉर्डनमधली एक उपनदी. समुद्र सपाटीपासून खाली वाहणारी ही नदी डेड सीला जाऊन मिळते. एका सीकमधून म्हणजे कॅन्यनमधून निघणाऱ्या ह्या नदीचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे होणारी ‘रिव्हर ट्रेल’. कंबरेपर्यंत पाणी आणि स्वच्छ लादी असल्यामुळे इथल्या सीकमधून ट्रेल्स म्हणजे दोन तीन तासांची पदयात्रा करण्याच्या उपक्रमाला इथलं टुरिझम डिपार्टमेंट भरपूर प्रोत्साहन देतंय. 

आम्हाला बर्‍याच जणांनी विचारलं देखील, की तुम्ही ही ट्रेल करताय ना? पण वेळेचा अभाव नि बरोबर अद्वैत असल्याने आम्ही ही ट्रेल नाही करायचं ठरवूनच निघालो होतो. एक क्षण ते निळसर स्वच्छ पाणी आणि दोन्ही बाजूंनी उभे असलेले रंगीबेरंगी सीक पाहून वाटलं की किती सुंदर अशी ही जागा जवळून पाहण्याची संधी गमावली. किती अविस्मरणीय आठवणी जोडण्याचा मौका गमावला. कदाचित अद्वैतला जमलं असतं. इथून पाहताना तरी ते सोपं वाटलं. खरोखर चालणाऱ्या हायकर्सना आम्ही विचारलं नाही. पण हो, सगळे थकलेले दिसत होते. आम्ही जरी ही ट्रेल केली नसली तरीही, इथे येणाऱ्या इच्छुकांना मात्र मी आवर्जून सांगेन की, त्यांनी वाडी मुजीबला नक्की भेट द्यावी. 

रस्त्याच्या एका बाजूला दिसणारा हा वाडी मुजीबचा नजारा नजरेआड झाला आणि दुसऱ्या बाजूने डेड सी दिसू लागला. गाडीने एक वळण घेतलं आणि आम्ही डेड सीच्या एकदम जवळून जाऊ लागलो. आमची मांडवी नदी ह्याहून मोठ्या पात्राची नक्की वाटावी इतकासा तो समुद्र. पलीकडची भूमी दिसे इतकं त्याचं वास्तव्य. समुद्र सपाटीपासून कितीतरी खोल असल्यामुळे ह्याचं पृथ्वीवरचा सर्वात खालचा किनारा म्हणून काय ते कौतुक. नाहीतर पाहण्यासारखं इथे काहीच नाही. माणूस इथे तरंगतो असं म्हणतात. म्हणजे नक्की काय होतं ते आता लवकरच कळलं असतं. 

आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. डेड सी ही पहिली अशी जागा जिथे पंचतारांकीत हॉटेल ‘air bnb’ पेक्षा स्वस्तात उपलब्ध होतं. तशी इथे हॉटेलांची कमी आहेच. इंटरनेटवर तर चार-पाचच राहण्याच्या जागा दिल्या होत्या. कदाचित सीमा क्षेत्र असल्याने इथे बांधकामाला भरपूर बंधनं असावीत, कारण एकंदर इतकं लोकप्रिय ठिकाण असूनही डेड सी नाजिकचा हा पट्टा अविकसित वाटला. आमच्या हॉटेलच्या जवळपास आणि काहीच नव्हतं. म्हणजे ना इतर दुकानं, ना उपहारगृहं, ना कोणत्याही प्रकारची कमर्शियल कॉम्प्लेक्स. 

इथल्या इलाक्यावर मोनोपोली असल्याने त्याच आवेशात आमचं स्वागत झालं. लॉबीमध्ये १५-२० मिनिटं बसवून ठेवलं. मग रिसेप्शनकडे बोलावलं. आणि सेक्युरिटी चेक तर इतका केला की, जितका एअरपोर्टवरही केला जात नाही. कदाचित, मी मघाशी म्हटल्याप्रमाणे सीमा क्षेत्र असल्याने इथे इतका कठोर पहारा ठेवला जात असावा. पण दमून भागून आलेल्या प्रवाशाला आपल्या खोलीत मिळणाऱ्या बेडची जी ओढ लागलेली असते ना, त्यात त्याच्या पूर्ण बॅगा उघडून आतलं सामान काढायला लावणं म्हणजे त्यावेळी ते घोर पाप वाटलं. रूमची चावी मिळाल्या बरोबर आम्ही धावतच निघालो. सुंदर रूम मिळाला होता. एका बाजूला समुद्र दिसत होता. दुसऱ्या बाजूला डोंगर. इंटरनेटवरच्या माहिती प्रमाणे आज रात्री खास “रेड मून” दिसणार होता. त्यामुळे मी ह्या रूमच्या पोझिशनिंग वर भारी खूश होते. 

आज पौर्णिमा होती, चंद्र ग्रहणही होतं, पण हा रेड मून नक्की काय? तर हा संपूर्ण चंद्रग्रहणात न्हाणारा चांदोबा, जेव्हा पृथ्वीच्या छायेत लपतो आणि पृथ्वीच्या वातावरणरुपी पदरातून प्रथम फिल्टर केलेला प्रकाश प्रतिबिंबित करतो, तेव्हा तो तांबूस दिसतो. अनेकदा ह्याला ‘ब्लड मून’ म्हणूनही ओळखलं जातं. आणि आज तो आम्हाला एकूण १५ मिनिटांसाठी दिसला असता. 

क्रमशः


भक्ती सरदेसाई