(भाग २)
जेवणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर जसा आपण यज्ञ करतो त्या पद्धतीने जेवले पाहिजे, म्हणजे नेमके कसे ते आपण पाहत आहोत. पहिल्या भागात आपण हे शिकलो की, जेवायला बसायची जागा स्वच्छ असली पाहिजे, देवाचं स्मरण करून, जेवण बनवणारे आई- बाबा, आजी व त्यासाठी लागणारे साहित्य निर्माण करणारे शेतकरी यांचे मनोमन आभार मानून जेवायला सुरुवात करावी. जेवताना एका जागी बसून जेवावे. आज आपण अजून काही मुद्दे बघुया.
- जसे यज्ञ करण्यापूर्वी आंघोळ करून शरीर स्वच्छ केले जाते. तसेच जेवणापूर्वी स्नान केलेले असावे. जेवणानंतर लगेच आंघोळ करू नये, कारण त्यामुळे आपण खाल्लेले पदार्थ नीट पचत नाही.
- जेवताना इतर विषयांत (म्हणजे टीव्ही, मोबाईल, पुस्तक इ. मध्ये) न गुंतता जेवणाकडे लक्ष ठेवून जेवणे. ताटात घरी बनवून वाढलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद आणि आनंद घेत जेवावे.
- ताटातील पदार्थ हे ताजे, पौष्टिक असले पाहिजे. ज्याप्रमाणे यज्ञासाठी वापरलेली द्रव्ये समिधा, तीळ, तूप, भात हे उत्तम दर्जाचे वापरले जातात.
- अन्नाविषयी वाईट शब्द उच्चारू नये. या विषयी 'श्यामची आई' या पुस्तकातील साने गुरुजींची गोष्ट मुद्दाम वाचा.
- जेवताना बोलणे किंवा हसणे टाळावे. आपण जर जेवताना बोललो, तर एखादा अन्नाचा कण आपल्या श्वासनलिकेत जाऊन आपल्याला तीव्र प्रकारचा ठसका लागू शकतो, खोकला येतो. आणि याचे गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात.
- ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा सांगा. स्वस्थ रहा, मस्त रहा.
वैद्य कृपा नाईक