ऑनर किलिंगवर आधारित ‘डीयर जस्सी’चे इफ्फीतील प्रदर्शन रोखले

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th November 2023, 12:45 am
ऑनर किलिंगवर आधारित ‘डीयर जस्सी’चे इफ्फीतील प्रदर्शन रोखले

पणजी : ऑनर किलिंगवर आधारित पंजाबी चित्रपट ‘डीयर जस्सी’चे इफ्फीतील प्रदर्शन रोखण्यात आले. हा चित्रपट शुक्रवारी पणजी येथे दुपारी २.३० वाजता दाखवण्यात येणार होता. मात्र दुपारी १२.३० वाजता हा चित्रपट दाखवण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या एनएफडीसीने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. पंजाब येथील न्यायालयात चित्रपट निर्मात्याविरुद्ध खटला चालू असल्यानेच त्याचे प्रदर्शन रोखण्यात आल्याची माहिती आहे.
याआधी टोरंटो चित्रपट महोत्सवात ‘डीयर जस्सी’ हा चित्रपट दाखवण्यात आला होता. त्यावेळी चित्रपट रसिकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले होते. चित्रपटाला या महोत्सवात पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळे इफ्फीतील अनेक प्रतिनिधींनी या चित्रपटासाठी आगाऊ बुकिंग केले होते. मात्र हा चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने बहुतेक प्रतिनिधी नाराज झाले. या ऐवजी यापूर्वी दाखवण्यात आलेला इंडियन पॅनोरमा विभागातील ‘आट्टम’ हा चित्रपट दाखवण्यात आला.
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्धी मिळाल्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार केला होता. मात्र जस्सीचा पती मिथु याने चित्रपटाला आक्षेप घेतला. त्याच्या आणि जस्सीच्या प्रेमावर किंवा आयुष्यावर आधारित चित्रपट करण्याचा अधिकार कोणालाच नाही, अशी भूमिका त्याने घेतली. अखेर याविरोध त्याने लुधियाना न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे.

रिक्षाचालकाशी लग्न केल्यामुळे कुटुंबियांनी दिली खुनाची सुपारी
हा चित्रपट २४ वर्षीय जसविंदर कौर सिद्धू (जस्सी) हिच्या ऑनर किलिंगवर आधारित आहे. जस्सी ही भारतीय कॅनेडियन होती. १९९४ मध्ये जस्सी भारतात आली होती. तेव्हा ती सुखविंदर सिंग सिद्धू ( मिथू) याच्या प्रेमात पडली. १९९९ मध्ये दोघांनी गुपचूपपणे लग्न केले. जस्सीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. जस्सीने एका रिक्षाचालकासोबत लग्न करणे हे त्यांना सहन झाले नाही. सन २००० मध्ये जस्सीची आई व काकाने सुपारी देऊन तिचा खून केला होता.