करण जोहरसारख्यांचे इफ्फीत काय काम?

अरविंद सिन्हा यांची टीका : लघुपट, माहितीपट करणाऱ्यांना प्राधान्य द्यावे

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
25th November 2023, 12:42 am
करण जोहरसारख्यांचे इफ्फीत काय काम?

पणजी : करण जोहर याच्यासारख्या बॉलिवूड निर्मात्यांना इफ्फीमध्ये आमंत्रण द्यायलाच नको होते, अशी टीका इंडियन पॅनोरमा माहितीपट आणि लघुपट विभागाचे ज्युरी मंडळाचे अध्यक्ष अरविंद सिन्हा यांनी केली. इफ्फीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करण जोहरला संधी देण्याऐवजी इफ्फीने स्वतंत्रपणे चित्रपट तयार करणाऱ्यांना संधी द्यावी, असेही ते म्हणाले.
सिन्हा म्हणाले की, करण जोहरसारख्या मोठ्या बॉलीवूड निर्मात्याला स्वतः च्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी इफ्फीच्या मंचाची गरज का भासावी? मुळात बॉलीवूड चित्रपटसृष्टी सर्वच अंगाने दिग्गज आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, मसल पाॅवर आहे. या सर्वांचा वापर करून ते विविध मंचांचा पुरेपूर उपयोग करून घेतात. असे असताना करदात्यांच्या पैशातून भरवण्यात येणाऱ्या इफ्फीमध्ये अशा सर्वांगाने तगड्या असणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांना संधी देणे योग्य नाही.
सिन्हा म्हणाले, याबाबत निर्णय घेणाऱ्या व्यक्तींनी करदात्यांचे पैसे करण जोहरसारख्या निर्मात्यावर खर्च होत आहे, याचाही विचार करणे आवश्यक होते. इफ्फीने लघुपट, माहितीपट करणाऱ्यांना प्राधान्य द्यावे. सर्व काही असणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना प्राधान्य देऊ नये. इफ्फीसारखे चित्रपट महोत्सव त्यांच्यासाठी नाहीतच. त्यांनी इकडे येऊच नये. कोणताही चित्रपट महोत्सव हा चांगल्या दर्जाच्या चित्रपटांसाठीच असावा.

माहितीपटांना सरकारने सहाय्य करावे!
सिन्हा म्हणाले की, पूर्वी राजे, महाराजे कलेला पाठिंबा देत असत. आता तो काळ राहिलेला नाही. आता सरकारनेच माहितीपटांना सहाय्य करणे आवश्यक आहे. माहितीपटांच्या निर्मितीसाठी जास्त पैसे लागत नाहीत. असे असले तरी नवोदित दिग्दर्शकांसाठी ते खूप जास्त असू शकतात. यासाठीच सरकारने निर्मितीमध्ये थोडी आर्थिक मदत करावी.