गीताबोध

Story: पालकत्व |
25th November 2023, 03:43 am
गीताबोध
  • यदा यदा ही धर्मस्य, ग्लानिर्भवती भारत।
  • अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।
  • परीत्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
  • धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे।

आपला आदरणीय, धर्मग्रंथ श्रीमद्भगवद्गीतेमधील हा श्लोक आम्हा सर्वांना परीचित आहे, जो श्रवण केल्यानंतर मनाला विलक्षण शांती प्राप्त होते. संपूर्ण सृष्टीचा संचालनकर्ता श्रीहरी विष्णूंनी, श्रीकृष्ण अवतारात, महाभारताच्या समयी, अर्जुनाला जो उपदेश केला, तो उपदेश वाचल्यानंतर वा ऐकल्यानंतर संपूर्ण मानवी जीवनाचा सार, तथा भक्तीची व्याख्या समजते. मुलांचे उत्कृष्ट भवितव्य घडवण्याच्या उद्देशाने गर्भवती मातेने, गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांच्या काळात या ग्रंथाचे श्रवण वा वाचन केले पाहिजे. मुलांना त्यांच्या वयोमानाप्रमाणे या धर्मग्रंथातील बोध केले पाहिजेत जेणेकरुन चांगले संस्कार आपल्या मुलांवर होतील. श्री मद्भगवद्गीता पुराणातून जीवनाचे कोणते महत्त्वाचे धडे मुलांना आकलन होऊ शकतात ते आज आपण पहाणार आहोत. 

जीवनसंघर्ष अन् सकारात्मकता

श्रीमद्भगवद्गीतेव्दारे आपल्या मुलांना जीवनसंघर्षाचा महत्त्वाचा बोध मिळतो. जीवन हे संघर्षाचेच नाव आहे, प्रत्येक दिवशी जीवनात फक्त वरिष्ठांनाच नव्हे तर मुलांनासुध्दा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि याच संघर्षांकडे दोन हात करताना मुलांची सकारात्मक वृत्ती कमी पडते. मुलांच्या मनावर तणाव उत्पन्न होतो, व यातूनच शालेय परीक्षेसारख्या सामान्य गोष्टीतसुध्दा नुकसान झाल्यास, स्वत:च्या जीवनाची हानी करण्याचे विचार मुलांच्या मनात उत्पन्न होतात. त्यामुळे भगवद्गीतेला अनुसरुन मुलांनी कुठल्याही संघर्षात संयमी वृत्ती कशी बाळगावी, योग्य अन् अयोग्यामध्ये भेद कसा करावा या रहस्याचा उलगडा पालकांनी मुलांसमक्ष करायला हवा.

व्यावहारीक पध्दतीने जीवनाकडे पाहण्याची दृष्टी

विज्ञानाने आज आकाशाची सीमा पार केली असली तरीही समाजात अनेक अंधविश्वास, काही दूषित मानसिकता आहेत, ज्यांना मुले सहज बळी पडतात. भगवद्गीतेचे मार्गदर्शन देऊन पालक मुलांना त्यांच्या भावनिक विश्वातून बाहेर काढू शकतात. आपल्या भावना जीवनात महत्त्वाच्या जरीही असल्या तरी देखील काही निर्णय भावनिकदृष्ट्या नाही, तर व्यावहारीक पध्दतीने घ्यावे लागतात, मग महत्त्वाचे निर्णय घेताना, कुठे हृद्याचा व कुठे मेंदूचा वापर अधिक करायचा हे ज्ञान पालकांनी मुलांना द्यावे. 

नेहमी गटात कार्य करावे

भगवद्गीतेतील ज्ञानाच्या माध्यमातून, एकतेचे, म्हणजेच मिळून मिसळून सर्वांसोबत काम करण्याचे ज्ञान पालक मुलांना देऊ शकतात, जेव्हा मुलांना कुठलेही काम एकमेकांसोबत मिळून गटात करण्याची आवड निर्माण होते, तेव्हा मुलांचा उत्साह वाढतो, गटात काम करण्याची क्षमता वाढते, नवीन नाती निर्माण करण्याची कला आत्मसात करता येते, एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण होते, मन तणावमुक्त राहते, व मुख्य मुद्दा, मुले स्वावलंबी बनतात, आपल्या उपक्रमांसाठी पालकांवर अवलंबून न राहता स्वत:ची कामे स्वत:, आपली बुध्दिमत्ता वापरुन करण्यास सुरुवात करतात, मग तो अभ्यास असो, कुठला प्रकल्प, उपक्रम, वा कुठलीही स्पर्धा. 

जीवनातील कर्माचा नियम

भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्या मुलांना आपण असा बोध देऊ शकतो, की जीवनात आपण कर्म म्हणजेच आम्ही केलेली चांगली वाईट कामे अन् त्यांचे परिणाम आपल्या दिशेने परत येणार. उदा. जर मुलांनी एका वृध्द माणसाची रस्ता ओलांडण्यास मदत वगैरे केली, तर हे त्यांचे सत्कर्म व त्याचे सुयोग्य फळ त्यांना कालांतरात नक्कीच हितकारक मिळेल, पण मुलांना हे सुध्दा समजायला हवे की आज जर आपण कुणालाही दुखावले, वा वाईट शब्द दिले, तर तिच वागणूक आपल्याला भविष्यात मिळणार. भविष्यात आपल्यालासुध्दा दुसऱ्याकडून अपमान सहन करावा लागेल, ह्याची जाणीव प्रत्येक मुलाला असावी.

निरंतर प्रगती

भगवद्गीतेचे ज्ञान मुलांची निरंतर प्रगती सुनिश्चित करते. जीवनात प्रगतीला कधीही अंत नसतो. उदा. कुठल्याही मुलाला जर गायनाची आवड असेल तर त्या आवडीनुसार केवळ प्रशिक्षण घेणे पुरेसे नाही, तर त्यात निरंतर प्रगतीच्या संधी प्राप्त करुन जास्तीतजास्त यश मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजेच जी कला आपण आत्मसात केली आहे, त्या कलेत सराव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सरावाशिवाय काहीच साध्य होत नाही. म्हणूनच आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालताना निरंतर प्रयत्न करुन ध्येयप्राप्तीकरीता तत्पर राहण्याची उत्सुकता पालकांनी मुलांच्या मनात निर्माण करावी.

पूजा शुभम कामत सातोस्कर