अभिनेते विजय सेतुपथीच्या हस्ते झाले पोस्टरचे अनावरण
पणजी : भारताच्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाची रंगत आता वाढत आहे. या महोत्सवातील गोवन स्टोरीज विभागात निवडल्या गेलेल्या सात सिनेमांची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. त्यातील ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ या लघुपटाचे प्रदर्शन २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. आयनॉक्स ऑडी ३ मध्ये होत आहे. अभिनेता विजय सेतुपथी यांनी नुकतेच या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण केले.
सहित स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ हा कोकणी लघुपट एक वेगळाच प्रयोग म्हणता येणार आहे. गेल्या दोन सलग वर्षांत सहित स्टुडिओच्या ‘कुपांचो दर्यो’ आणि ‘अर्दो दीस’ या दोन लघुपटांनंतर आता ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’ची निवड सलग तिसऱ्या वर्षी इफ्फीच्या गोवन स्टोरीज विभागात होत आहे. हा लघुपट म्हणजे गेल्या दोन सिनेमांचा पुढील भाग म्हणजेच लघुपट त्रयी म्हणता येईल. अगोदरच्या दोन भागांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता तिसऱ्या भागात जॉय आणि मानवी यांचे आयुष्य कोणत्या वळणावर येऊन ठेपले आहे, याचे कुतूहल प्रेक्षकांमध्ये नक्कीच आहे.
किशोर अर्जुन यांच्या सहित स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘पीस लिली सॅण्ड कॅसल’चे दिग्दर्शन हिमांशू सिंह यांनी केले आहे. तर गोमंतकीय कलाकार उगम जांबवलीकर, दक्षा शिरोडकर, सोबिता कुडतरकर यांच्या या लघुपटात भूमिका आहेत.