लाच घेऊन नौदलात भरती करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा पर्दाफाश!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st November 2023, 02:27 pm
लाच घेऊन नौदलात भरती करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा पर्दाफाश!

कुलाबा : भारतीय सेनेत भरतीसाठी कठोर वैद्यकीय अटी पूर्ण करणे बंधनकारक असते. यासाठी लष्करात ‘वैद्यकीय चिकित्स अधिकारी’ नियुक्त केलेले असतात. नौदलाचा याच पदावरील अधिकारी चक्क लाच घेऊन उमेदवाराला भरतीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देत होता, असे उघडकीस आले आहे. संजू अरालीकट्टी असे या अधिकाऱ्याचे नाव असून सीबीआयने त्याला अटक केली आहे.

काय आहेत एकंदरीत प्रकरण

संशयित संजू अरालीकट्टी हा मुंबईतील कुलाब्यात असलेल्या नौदलाच्या हॉस्पिटल स्टेशनमध्ये कार्यरत होता. वैद्यकीय चाचणीसाठी येणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी ३० हजारांची लाच मिळाल्यावर तो बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र द्यायचा. त्यात उमेदवाराच्या आरोग्याच्या दृष्टीने असलेल्या उणीवा लपवून, तो धडधाकट असल्याचे नमूद करायचा. या कारणाने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

सीबीआयने आरोपीच्या घरी छापा टाकत अनेक दस्तऐवज हस्तगत केले आहेत. त्यानंतर त्यास ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नौदलाची शारीरिक आणि लेखी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची वैद्यकीय चाचणी केली जाते. एका व्यक्तीने संशयिताविरुद्ध त्याने लाच घेतल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयने कारवाई करत संशयिताला अटक केली आहे. सद्या या रॅकेटमध्ये सहभाग असलेल्या इतरांचाही शोध सीबीआय घेत आहे.