उत्तराखंडच्या तरुणाने दारूच्या नशेत केला होता जीवघेणा हल्ला; म्हापशातील जखमीचा अखेर मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st November, 09:49 am
उत्तराखंडच्या तरुणाने दारूच्या नशेत केला होता जीवघेणा हल्ला; म्हापशातील जखमीचा अखेर मृत्यू

अटक केलेल्या हिमांशू पटवाल सोबत म्हापसा पोलीस स्थानकाचे पथक.

म्हापसा : येथील टॅक्सी स्टॅण्डजवळ क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत रामा गुणपत्रे (५६, खोर्ली) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित हिमांशू पटवाल (३३, उत्तराखंड) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याने घटनेच्या दिवशीच संशयिताला बांबोळी येथील मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती.

मारहाणीची ही घटना गुरुवार, १६ रोजी घडली होती. संशयित हिमांशू हा मडगावात एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्या दिवशी तो म्हापशात आला होता. तो दारुच्या नशेत होता. याच नशेत संशयिताने क्षुल्लक कारणावरून गुणपत्रे यांच्याशी वाद घातला आणि त्यांना रस्त्यावरच लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती खालावल्याने त्यांना नंतर गोमेकॉत हलविले होते. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी आधी या प्रकरणी संशयित हिमांशू याच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम ३०७ अंतर्गत जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला होता. आता ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, संशयिताचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे आढळून आल्याने घटनेच्याच दिवशी त्याला बांबोळी येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला रीतसर अटक केली आहे. 

हेही वाचा