धारबांदोडातील जंक्शन ठरतेय जीवघेणे

आतापर्यंत दोघांचा बळी : उपाययोजना करण्याची मागणी


21st November, 12:46 am
धारबांदोडातील जंक्शन ठरतेय जीवघेणे

राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक बनलेले सावर्डे जंक्शन.

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

फोंडा :    धारबांदोडा येथील अपघाताला आमंत्रण देणाऱ्या सावर्डे जंक्शनवर रविवारी सकाळी दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. या धोकादायक जंक्शनवर दहा वर्षांपूर्वी दावकोण (धारबांदोडा) येथील एकाचा बळी गेला होता. कित्येक वर्षांपासून हे जंक्शन धोकादायक ठरलेले असतानाही याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने तोडगा काढलेला नाही. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिकांतून जोर धरत आहे.      

बेळगाव ते गोवा महामार्गावरील सावर्डे जंक्शनवर वाहनचालक गोंधळतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या जंक्शनवर ८-१० वर्षापूर्वी दावकोण येथील एका युवकाचा खनिजवाहू ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतरही जंक्शनवर अनेकांना जीव गमावावा लागला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. रविवारी झालेल्या अपघातात दावकोण येथील गोकुळदास गावकर यांचा मृत्यू झाला. या जंक्शनबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने तोडगा काढणे आवश्यक होते. परंतु आजतागायत या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याने या भागातील नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

जंक्शनवरील अपघातांत जीवितहानी होत आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील वाहनांचा वेग या अपघातप्रवण क्षेत्रात कमी करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलण्याची गरज आहे.

— अॅड. आतीश गावकर

पंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावर अधिक अपघात होत आहेत. धारबांदोडा उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जंक्शनवर आवश्यक सूचना फलक व गतिरोधकांवर चमकणारे  स्टिकर लावण्याची विनंती करणार आहे.   

— विनायक उर्फ  बालाजी गावस, सरपंच, दावकोण   

हेही वाचा