जल जीवन मोहिमेसाठी केंद्राकडून गोव्याला २.८१ कोटींचा निधी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st November, 12:01 am
जल जीवन मोहिमेसाठी केंद्राकडून गोव्याला २.८१ कोटींचा निधी

पणजी : जल जीवन मोहिमेसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याला २ कोटी ८१ लाख २५ हजारांचा निधी दिला आहे. जल जीवन मोहिमेचे काम पूर्ण करण्यासह पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे कामही करावे लागणार आहे.
केंद्रीय जल जीवन मोहिमेखाली पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविल्या जातात. सर्व राज्यांना यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून निधी दिला जातो. २०२३ - २०२४ या आर्थिक वर्षासाठी ५ कोटी ६२ लाखांचा निधी गोव्याला मिळणे अपेक्षित होते. यापैकी २ कोटी ८१ लाख २५ हजार रुपयांचा हप्ता जारी केला आहे. हा निधी जल जीवन मोहिमेखालील योजनांसाठीच राबवावा लागेल. निधी अन्य कामांसाठी खर्च करता येणार नाही, असे जलशक्ती मंत्रालयाच्या अवर सचिवांनी स्पष्ट केले आहे.
निधीच्या वापरानंतर विनियोग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे तसेच निधीचे लेखा परीक्षण महालेखापाल (कॅग) करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.