पणजी : सरकारने दुकाने आणि आस्थापनांत महिलांना संध्याकाळी ७ ते पहाटे ६ पर्यंत काम करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र याबाबत तयार केलेल्या नियमांची योग्य अंमबजावणी होते का हे पाहण्यासाठी विशेष समितीची स्थापना करावी अशी मागणी गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप यांनी केली. सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी एल्सिंडा गोन्सालविस, ॲड. लविनिया डिकोस्टा उपस्थित होत्या.
खलप म्हणाल्या की, सरकारने याबाबत काही दिवसांपूर्वी अधिसूचना जारी केली आहे. महिलांना रात्रपाळीत काम करण्याच्या निर्णय चांगला आहे. मात्र आस्थापनांकडून अशा महिलांच्या सुरक्षिततेचे नियम पाळले जाणे तेव्हढेच आवश्यक आहे. यासाठीच सरकारने अनुपलान समितीची स्थापना केली पाहिजे. समितीने वेळोवेळी दुकाने, आस्थापनात महिला सुरक्षित आहेत का याचे ऑडिट केले पाहिजे. तसेच आस्थापांनाच्या अचानक तपासणीचे अधिकार देखील समितीला असले पाहिजेत.
त्या म्हणाल्या, रात्रपाळीत काम करण्यासाठी महिला कामगारांची लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र महिलांकडून जबरदस्ती अशी परवानगी लिहून घेतली जाऊ नये यासाठी यंत्रणा असणे गरजेची आहे. अशा महिलांना त्यांच्या घरातून ने-आण करण्यासाठी वाहतुक व्यवस्था आवश्यक करण्यात आले आहे. यासाठी वाहतुकीचा खर्च महिलांच्या पगारातूनच कापला न जाता यासाठी सरकार काही अनुदान देणार आहे का हे स्पष्ट करावे. अशा वाहनांमध्ये महिला सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे.
सुरक्षिततेशिवाय महिला सबलीकरण नको
खलप म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष महिला सबलीकरणाला नेहमीच पाठिंबा देईल. मात्र सुरक्षित वातावरण असल्याशिवाय महिला सबलीकरण हे महिलांचे शोषण ठरणार आहे. सरकारने आधी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवणे, सर्व ठिकाणी पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावणे या मूलभूत गोष्टी पूर्ण कराव्या