प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजी

Story: राज्यरंग | प्रसन्ना कोचरेकर |
20th November 2023, 09:44 pm
प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर भाजप नेत्यांमध्ये नाराजी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे पुत्र आणि शिकारीपूरचे आमदार बी. वाय. विजयेंद्र यांची भाजपच्या वरिष्ठांकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मात्र, या नियुक्तीनंतर कर्नाटकमधील भाजपच्या इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी येडियुरप्पा स्वत: मैदानात उतरले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विजयेंद्र यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करणारा आदेश जारी केला. यापूर्वी ते भाजपचे उपाध्यक्ष होते. मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नलिनकुमार कटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. लिंगायत समाजाचा भाजपला पाठिंबा रहावा यासाठी विजयेंद्र यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.  २०२० पासून विजयेंद्र हे कर्नाटकात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कर्नाटक युनिटचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. विजयेंद्र हे पेशाने वकील आहेत. त्यांचे भाऊ बी. वाय. राघवेंद्र हे शिमोगा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यानंतर कर्नाटक भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपद तसेच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात आली नव्हती. यानंतर कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार बी. वाय. विजयेंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीनंतर कर्नाटकमधील भाजपच्या इतर नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

कर्नाटक भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. बी. एस. येडियुरप्पा यांच्या समर्थकांनी विजयेंद्र यांच्या नियुक्तीवर जल्लोष केला, तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या गटातील नेत्यांनी विजयेंद्र यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कर्नाटकातील भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. यामध्ये भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, आमदार बसनगौडा पाटील, माजी मंत्री के. एस. ईश्वराप्पा, व्ही. सोमन्ना यांचा समावेश आहे. या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर येडियुरप्पा त्यांची समजून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आगामी वर्षात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचे नेतृत्व विजयेंद्र यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपला जिंकणे सोपे व्हावे यासाठी येडियुरप्पा नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नलिनकुमार कटील यांच्याकडे होती. कटील यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रवी यांच्याकडेच दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांची नेमणूक करण्यात आली. रवी हे संतोष यांच्या गटातील नेते मानले जातात. यामुळे रवी हे विजयेंद्र यांच्या नियुक्तीला विरोध करत आहेत. विरोधी पक्षनेतेपद अद्यापही रिक्त आहे. या पदावर वर्णी लागण्यासाठी अनेक जण प्रयत्नात आहेत. यासाठी दुसऱ्या गटानेही मोर्चेबांधणी केली आहे.