खूनप्रकरणी दोघांविरुद्ध आरोप निश्चितीचा आदेश

मच्छीमारी बोटीवरील कामगाराचा खून प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th November, 12:11 am
खूनप्रकरणी दोघांविरुद्ध आरोप निश्चितीचा आदेश

पणजी : मालीम जेटी - बेती येथे २०२२ मध्ये मच्छीमारी बोटीवरील कामगार शिब्रन राम (मुळ छत्तीसगड) याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी संतोष भगर आणि देवनारायण भगत या दोघांविरोधात सबळ पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने त्याच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. याबाबतचा आदेश उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्या. शर्मिला पाटील यांनी दिला.

बोट मालक सीताकांत परब यांनी ५ मार्च २०२२ रोजी या प्रकरणी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, शिब्रन राम याचा दि. ४ रोजी वाढदिवस होता. त्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या मित्रांना मालीम जेटीवरच पार्टी आयोजित केली होती. संशयित संतोष भगत, देवनारायण भगत याच्यासह सुमीत कुजूर, प्रदीप भगत, रामदयाल राम, ओम प्रकाश सिंग, प्रमेश सिंग व इतर उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यात दारुच्या नशेत क्षुल्लक कारणामुळे भांडण झाले. त्यावेळी संतोष भगत, देवनारायण भगत याच्यासह सुमीत कुजूर, प्रदीप भगत या चार जणांनी शिब्रम राम याला जबर मारहाण केली. त्यावेळी तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्या अवस्थेत त्याला मांडवी नदीत फेकून दिल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली. याची दखल घेऊन पर्वरी पोलिसांनी वरील पैकी संशयित संतोष भगत, देवनारायण भगत याच्यासह सुमीत कुजूर, प्रदीप भगत या चार जणांना खुनी हल्ल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. याच दरम्यान ५ मार्च २०२२ रोजी सकाळी शिब्रन राम याचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळला. त्यानंतर पोलिसांनी वरील संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

या दरम्यान संशयित सुमीत कुजूर, प्रदीप भगत याचा खून प्रकरणात हात नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना वगळले. तर संशयित संतोष भगत आणि देवनारायण भगत या दोघांविरोधात पोलिसांनी २७ मे २०२२ रोजी म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. खून प्रकरण सत्र न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत असल्यामुळे १६ जून २०२२ रोजी तिथे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी सुनावणी घेतली असता, संशयित संतोष भगत आणि देवनारायण भगत याच्या विरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला. 

हेही वाचा