पेडणेतील आस्थापनाला १० लाखांचा गंडा, एकावर गुन्हा
पणजी : बांबूच्या वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली आगरवाडा - पेडणे येथील मुदिता एंटरप्राइजेज आस्थापनाला १० लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी केरळ येथील सिनर्जी कंपनीचा मालक मंगोलुपरा रवीशंकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुदिता एंटरप्राइजेज एल. एल. पी. आस्थापनाचे साईनंद सोपटे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आस्थापनाला केरळ येथील सिनर्जी कंपनीचे मालक मंगोलुपरा रवीशंकर यांनी बांबूच्या वस्तूचा पुरवठा करण्यासाठी १० लाख रुपये घेतले होते. असे असताना संशयितांनी ठरल्या प्रमाणे बांबूच्या वस्तूंचा पुरवठा केला नाही. तसेच वरील रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदारांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पेडणेचे पोलीस निरीक्षक सचिन लोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी संशयिताच्या विरोधात भादंसंच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.