फुर्र आजी

Story: छान छान गोष्ट | गीता गरुड |
19th November 2023, 04:17 am
फुर्र आजी

सुधांशूला जवळचे आजीआजोबा नव्हते. तो अलिबागला आईसोबत मावशीआजीच्या घरी एकदोनदा जाऊन आला, त्यालाही बरीच वर्षं लोटली होती. 

गेल्या दोन वर्षापासनं सुधांशूच्या जीवन विकास शाळेत आजीआजोबा संंमेलन दिवस साजरा करत होते. सुधांशू त्या दिवशी हमखास हिरमुसला व्हायचा. चापुनचोपून केस बांधलेल्या, सुती साडी नेसलेल्या, क्वचित हाती काठी असलेल्या मित्रमैत्रिणींच्या आज्या आणि सदरा-लेंगा घालून आलेले आजोबालोक मुलं मोठ्या दिमाखाने मिरवायची. सुधांशूलाही वाटे आपले आजीआजोबा असते तर..

सुधांशूच्या आईने आपल्या बाळाची अस्वस्थता ओळखली होती पण केवळ सुधांशूसाठी मावशीआजीस इकडे यायला लावायचं म्हणजे नकोच ते. ती मनाशीच म्हणायला नि आलोकदादाचा फोन आला. हा आलोकदादा म्हणजे मावशीआजीचा मुलगा. तर झालं होतं काय, आलोकदादा व त्याची पत्नी आयुषी यांना पंधरा दिवसांसाठी थंड हवेच्या ठिकाणी जायचे होते. मावशीआजीला कायमची सर्दी, त्यात संधीवात त्यामुळे तिला तिकडे न्हेणे इष्ट ठरणार नव्हते.

सुधांशूच्या आईने मावसभावाची अडचण जाणली व म्हणाली, "म्हणजे आता एका दगडात दोन पक्षी मारता येतील. तू मावशीला आमच्याकडे ठेवून बिनधास्त जा." चारच दिवसांत मावशीआजी सुधांशूच्या घरी अवतरली. सुधांशूला कोण आनंद झाला! 

सुधांशूने मावशीआजीला ‘आजीआजोबा दिवसा’विषयी सांगितलं. आजी म्हणाली, "मी नक्की येईन पण माझ्या काही अटी आहेत. त्या मान्य केल्या गेल्या तरच."

सुधांशूने विचारलं,"त्या कोणत्या?"

"तू तो पाकिटातला खाऊ आणतोस, तो बंद करायचा. मी डबा भरून लाडू न चकल्या आणल्यात, त्या खायच्या मधल्या वेळच्या भुकेला."

आजीची अट सुधांशूला मान्य करावीच लागली.

आजीच्या हातचे गोलगरगरीत बेसनलाडू न चकल्या अगदी फर्मास झाल्या होत्या. चहा पिताना सुधांशू आजीच्या बाजूला बसे.

मावशीआजीने कपासोबत बश्या मागून घेतल्या. कपातला चहा बशीत ओतून ती “फुर्र फुर्र” करत पिऊ लागली. ते पाहून सुधांशूला खूप मजा आली. त्यानेही आपला चहा बशीत ओतून घेतला व “फुर्र फुर्र” करू लागला. बशीतल्या चहावर तरंग उमटले. सुधांशूने आजीचं नामकरण केलं ‘फुर्र आजी’.

फुर्र आजीसाठी त्याने आईला मोगऱ्याचा गजरा आणायला लावला. आजीआजोबा संमेलनादिवशी फुर्र आजीच्या पेहरावाकडे त्याचे विशेष लक्ष होते. खूप छान नटूनथटून फुर्र आजी तयार झाली. आजीचा हात पकडून तिला शाळेत न्हेताना सुधांशूला कोण अभिमान वाटत होता. सुधांशूने शाळेतल्या बाईंशी, शिपाईमामांशी फुर्र आजीची ओळख करून दिली.

आपली ओळख करून देताना फुर्र आजीने तिचं शिक्षण, छंद, तिला असलेली खेळाची विशेष आवड यासंबंधी भरभरून सांगितले. एक गोड गाणेही ती गायली. इकडे सुधांशूची कॉलर ताठ होत होती. चहापानाच्या कार्यक्रमावेळी चहाचे कप येताच सुधांशू म्हणाला, “माझ्या फुर्र आजीला बशी द्या. तिला चहा कसा फुर्र फुर्र करत प्यायला आवडतो.” सुधांशूच्या या बोलण्यावर संमेलनात हशा पिकला. सुधांशूची फुर्र आजीही त्यात सामील झाली व सुधांशूची पापी घेत म्हणाली, “माझा लाडाचा नातू तो! किती गं बाई काळजी याला माझी!”