हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गट टप्प्यातील सलग दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा १६-१ असा दारूण पराभव केला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. यात त्यांनी एक गोल केला. त्यानंतरही संघाचा गोल करण्याचा क्रम थांबला नाही आणि भारताने एकापाठोपाठ एक १६ गोल करत शानदार विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक चार गोल केले तर, मनदीप सिंगने गोलची हॅटट्रिक केली.
आशियाई स्पर्धेत यापूर्वी भारतीय हॉकी संघाने गट टप्प्याच्या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव केला होता. मंगळवारी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सिंगापूरचा १६-१ असा पराभव केला. मनदीप सिंगने १३व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. पहिल्या क्वार्टरअखेर भारताने १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला १६व्या मिनिटाला ललित कुमारने भारतासाठी दुसरा गोल केला.
चौथा क्वार्टरमध्ये मनदीप सिंगने ५०व्या मिनिटाला दोन गोल नोंदवले. अभिषेकने मिळालेल्या संधीचा फायदा घेत ५१व्या आणि ५२व्या मिनिटाला दोन गोल केले. यानंतर ५३व्या मिनिटाला सिंगापूरच्या झकी जुल्करनैनने संघासाठी पहिला आणि शेवटचा गोल केला. अवघ्या २ मिनिटांनंतर, भारताच्या वरुण कुमारने ५५व्या मिनिटाला सलग दोन गोल करत भारताला १६-१ ने आघाडीवर नेले. अशा प्रकारे भारताने सिंगापूरविरुद्ध दणदणीत विजय नोंदवला. या विजयाने भारतीय संघ ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.
भारतीय हॉकीपटूंनी सिंगापूरला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही. यानंतर २२व्या मिनिटाला गुजरांतने संघासाठी तिसरा गोल तर २३व्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने संघासाठी चौथा गोल तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने संघाच्या खात्यात पाचवा गोल केला. मनदीप सिंगने २९व्या मिनिटाला आपला दुसरा आणि संघाचा सहावा गोल केला. दुसऱ्या हाफमध्ये ३७व्या मिनिटाला मनदीप सिंगने संघाचा ७ वा आणि ३८व्या मिनिटाला समशेर सिंगने ८ वा गोल केला. त्यानंतर ४०व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल केला. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच भारताने १०-० अशी भक्कम आघाडी घेतली. ४२व्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एक पेनल्टी कॉर्नर घेत संघासाठी ११वा गोल केला. अशा प्रकारे, तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस भारताने ११-० अशी कमांडिंग आघाडी मिळवली.