क्रिकेट मैदानाचे स्वप्न

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान झाले तर गोव्यात नियमितपणे क्रिकेटचे सामने होतील. गोव्यातील क्रिकेटप्रेमींसह देशभरातील तसेच जगातील क्रिकेटप्रेमी गोव्यात येतील. गोवा क्रिकेट असोशिएशनने क्रिकेट मैदानासाठी पुढाकार घेऊन गोव्यात सुसज्ज असे क्रिकेट मैदान उभारावे.

Story: अग्रलेख |
26th September, 11:44 pm
क्रिकेट मैदानाचे स्वप्न

गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान व्हावे यासाठी गेली कित्येक वर्षे गोवा क्रिकेट संघटना प्रयत्न करत आहे, पण दरवेळी जागा बदलामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेले नाही. थिवी, म्हावळींगे, धारगळ अशा अनेक नावांचा विचार झाला. जे क्रीडा मंत्री आले त्यांनी वेगवेगळ्या जागांना पसंती दिली, यामुळे शेवटपर्यंत गोव्यात क्रिकेट मैदान झाले नाही. पंधरा सोळा वर्षांपूर्वी जेव्हा थिवी येथे क्रिकेट मैदान उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्यावेळी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हरकत घेतल्यामुळे ते काम थांबले. जीसीएचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांचा थिवी हा मतदारसंघ होता, त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळापासून थिवीत क्रिकेट मैदान व्हावे यासाठी जीसीएने अनेकदा प्रयत्न केला. त्यानंतर म्हावळींगेतील जागेचा विचार झाला. मध्यंतरी डॉ. शेखर साळकर वगैरे मंडळी सक्रिय झाली, तेव्हा जीसीएने डिचोलीला प्राधान्य दिले. पण तो प्रस्तावही पुढे गेला नाही. त्यानंतर बाबू आजगावकर क्रीडा मंत्री झाले. त्यांनी धारगळमध्ये क्रिकेट मैदान उभाणार, असा निर्धार केला. पण धारगळ असो, थिवी असो किंवा म्हावळींगे आजपर्यंत क्रिकेट मैदान उभारण्याचे स्वप्न अस्तित्वात आलेच नाही. गोव्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाची गरज आहे. इथल्या खेळाडूंसाठी आणि गोव्यात बंद झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने किंवा आयपीएलचे सामने व्हावेत म्हणून इथे मैदान होण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्रात गोव्याचा नावलौकिक हा साधन सुविधांमुळेही वाढेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान झाले तर गोव्यात नियमितपणे क्रिकेटचे सामने होतील. गोव्यातील क्रिकेटप्रेमींसह देशभरातील तसेच जगातील क्रिकेटप्रेमी गोव्यात येतील. गोवा क्रिकेट असोशिएशनने क्रिकेट मैदानासाठी पुढाकार घेऊन गोव्यात सुसज्ज असे क्रिकेट मैदान उभारावे.      

फातोर्डातील मैदान फुटबॉलसाठीच वापरले जाते. जीसीएकडे पर्वरीत असलेले मैदान हे प्रशिक्षणापुरते आहे. जिमखान्याकडे असलेले क्रिकेट मैदान हे प्रादेशिक स्पर्धेपुरते आहे. पण हजारो प्रेक्षक बसू शकतील अशी आसन व्यवस्था असलेले क्रिकेट मैदान गोव्यात नाही. गोव्यातील क्रिकेटप्रेमींचे हे स्वप्न जीसीएने पूर्ण करायला हवे. सगळे हेवेदावे दूर ठेवून क्रिकेट मैदान उभारण्याच्या एका गोष्टीवर सर्वांनी एकत्र यायला हवे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या गोव्यातील वार्षिक सभेत गोव्यातील क्रिकेट मैदानाचा विषय आला. या क्रिकेट मैदानासाठी लागणारा २५० कोटींचा खर्च उचलण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचे गोव्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे दिसू लागले आहे. सध्या जीसीएकडे वन म्हावळींगे येथील जमीन आहे. तिथे हे क्रिकेट मैदान झाले तर डिचोलीचाही विकास होईल. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शहा यांनी वन म्हावळींगे येथील जमिनीला पसंती दिली आहे. कारण ही जमीन जीसीएच्या ताब्यात आहे. त्यामुळे धारगळमध्ये किंवा अन्य कुठल्याही जागी नव्याने क्रिकेट मैदानासाठी सोपस्कार करण्यापेक्षा ताब्यात असलेल्या जमिनीत क्रिकेट मैदान उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली तर लवकर मैदान उभे राहू शकते. विशेष म्हणजे जीसीएने स्वतंत्रपणे जरी क्रिकेट मैदान उभारण्याची योजना आखली तरीही ते शक्य आहे. कारण जीसीएला बीसीसीआयकडून दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपये मिळत असतात. आयपीएलच्या महसुलातील वाटा दरवर्षी जीसीएला येतो. पण जीसीएकडून या निधीतून आतापर्यंत फार मोठे कार्य झालेले नाही. गोव्यात क्रिकेटचे मैदान उभारायचे झाले तर बीसीसीआयकडून २५० कोटी रुपये मिळतील या प्रतिक्षेत राहण्यापेक्षा जीसीएला आपल्याला मिळणाऱ्या पैशातून हे मैदान उभारणे शक्य आहे. पण जीसीएसाठी चांगली बाब म्हणजे बीसीसीआयने या मैदानासाठी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. यापेक्षा चांगला योग आणि संधी जुळून येणार नाही. त्यामुळे जीसीएने आता क्रिकेट मैदानाच्या उभारणीवरच लक्ष द्यावे लागेल. गेल्या ३२ वर्षांपासून जीसीए क्रिकेट मैदान उभारण्यासाठी बीसीसीआयकडे प्रस्ताव पाठवत असते. या प्रस्तावाचे प्रत्यक्षात पुढे काही होत नाही. यावेळी बीसीसीआयने जीसीएला आश्वासन दिल्यामुळे गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज क्रिकेट मैदान उभे राहू शकते. मध्यंतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही क्रिकेट मैदान उभारण्यासाठी जीसीएने एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. सरकार शक्य ती मदत करेल, असे सांगितले होते. त्यामुळे जीसीएला सर्व बाजूंनी पाठिंबा असल्यामुळे गोव्यात लवकरच क्रिकेट मैदान उभारण्यास प्रारंभ होईल, अशी अपेक्षा ठेवूया.