म्हापसा पालिकेचा कार्यभार अर्धवेळ मुख्याधिकाऱ्यांकडेच

मुख्याधिकारी शिरवईकर यांची बदली

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September, 11:39 pm
म्हापसा पालिकेचा कार्यभार अर्धवेळ मुख्याधिकाऱ्यांकडेच

म्हापसा : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांची कर्मचारी भरती आयोगाच्या अवर सचिवपदी बदली झाली आहे, तर साबांखाच्या सर्वे विभागाचे अधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याकडे पालिका मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव ईशांत सावंत यांनी जारी केला आहे.
म्हापसा पालिका मुख्याधिकारी पदी अमितेश शिरवईकर यांची गेल्या ऑगस्ट २०२२ मध्ये सरकारने नियुक्ती केली होती. यंदा १५ मे २०२३ पासून ते रजेवर गेले होते. शिरवईकर यांनी प्रथम पंधरा दिवस पितृत्व रजा घेतली होती. पण त्यानंतर दि. १ जूनपासून ते अनिश्चित कालावधीसाठी रजेवर गेले होते. दर आठ-पंधरा दिवसांनी ते रजा वाढवत होते. त्यामुळे सरकारने म्हापसा पालिका मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त ताबा सध्या साबांखाचे सर्वे अधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याकडे दिला होता.
सुमारे ४ महिन्यानंतर गेल्या २२ सप्टेंबर रोजी शिरवईकर यांनी पालिका मुख्याधिकारी पदाचा ताबा घेतला. पदभार स्वीकारताच तीन दिवसांच्या आत दि. २५ सप्टेंबर रोजी शिरवईकर यांची कर्मचारी भरती आयोगाच्या अवर सचिवपदी बदली केल्याचा आदेश जारी झाला.
पालिका मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त ताबा असलेले चंद्रकांत शेटकर यांच्याकडेच या पदाचा पुन्हा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. शेटकर हे साबांखाच्या सर्वेक्षण विभागाचे अधिकारी (एसएलएओ) असून त्यांच्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एसएलएओचा अतिरिक्त ताबा आहे.
पूर्वीप्रमाणेच शेटकर हे दर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवसच पालिका कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे पालिका कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.