चोरट्यांनी दिला शॉक!.. कोलवाळमधून साडेतीन हजार मीटर लांब विजेची तार पळवली

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th September 2023, 04:05 pm
चोरट्यांनी दिला शॉक!.. कोलवाळमधून साडेतीन हजार मीटर लांब विजेची तार पळवली

म्हापसा : वीज खात्याने कंत्राट दिलेल्या एका कंपनीची तब्बल साडेतीन हजार मीटर लांबीची वीजतार (कंडक्टर) आणि ६ शिव रोलर चोरट्यांनी लंपास केल्याने कंपनीला चांगलाच शॉक बसला आहे. कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीमधून ही चारी झाली असून ज्योती स्ट्रक्चर लि. कंपनीच्या अधिकाऱ्याने पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

गोव्याच्या वीज खात्याने या कामाचे कंत्राट वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील ज्योती स्ट्रक्चर लि. कंपनीला दिले आहे. याच कामासाठी कंत्राटदार कंपनीने कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीमध्ये शिव रोलर आणि वीज कंडक्टर (वीजतारा) आणून ठेवल्या आहेत. यातील ६ रोलर आणि सुमारे साडेतीन हजार मीटर लांबीची तार चोरट्यांनी कापून नेली आहे.
१७ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ या काळात वरील चोरीचा प्रकार घडला. २२ रोजी दुपारी हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या अधिकार्‍यांना शॉक बसला. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश कुमार पटनाईक यांनी लगेच कोलवाळ पोलिसांत धाव घेऊन रितसर तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात भा.दं.सं.च्या ३७९ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत खरात करीत आहेत.