खोर्लीच्या आरोग्य केंद्रात ज्या डिजिटल सेवा आणि सुसज्ज उपचार पद्धती आहेत त्या गोव्यातील प्रत्येक तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात दिल्यास गोव्यातील आरोग्य क्षेत्रात ती मोठी क्रांती ठरणार आहे.
सरकारी इस्पितळांचा कारभार हा राम भरोसे असतो. पण गोव्यात अनेकांना सरकारी इस्पितळांचा चांगला अनुभवही आलेला आहे. गोमेकॉसारख्या इस्पितळात रुग्णांची अफाट गर्दी असते त्यामुळे खाटांची जमवाजमव करण्यापासून ते उपचार करण्यापर्यंत अनेकदा उशीर होतो, पण चांगले उपचार देण्यासाठी गोव्यातील सरकारी इस्पितळांचा हात कोणी धरू शकणार नाही. गोमेकॉच नव्हे तर म्हापसा आणि मडगावमधील जिल्हा इस्पितळांमध्येही चांगल्या प्रमाणात उपचार होतात. दुर्दैवाने काही आरोग्य केंद्रांमध्ये हवे तसे उपचार होत नाहीत किंवा तिथे सुविधा नसल्यामुळे रुग्णांना जिल्हा इस्पितळ किंवा गोमेकॉत जावे लागते. डिचोली आरोग्य केंद्राविषयी अशा अनेकदा तक्रारी येतात. पण हे अपवाद वगळले आणि सरकारने थोडे लक्ष केंद्रित केले तर प्राथमिक आणि इतर आरोग्य केंद्रांमध्येही चांगले उपचार मिळू शकतात. कोविड काळात सरकारी आरोग्य केंद्रांनी रुग्णांच्या चाचणीत महत्त्वाची कामगिरी बजावली. खासगी चाचणीसाठी शेकडो, हजारो रुपये मोजावे लागायचे, पण सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्यांना चांगल्या सेवा दिल्या गेल्या. सरकारची अशी अनेक आरोग्य केंद्रे आहेत, जिथे चांगले उपचार मिळतात. त्यातील एक आरोग्य केंद्र खोर्लीचे. खोर्ली आरोग्य केंद्र रुग्णांना चांगली सेवा देण्यात अग्रेसर आहे. तिथे जाणाऱ्या बहुतांशी रुग्णांना चांगलाच अनुभव येतो. खोर्ली आरोग्य केंद्राच्या कामातून इतर आरोग्य केंद्रांनी बोध घेण्याची गरज आहे. तसे झाले तर राज्यातील आरोग्य सेवांमध्ये निश्चितच मोठे बदल होतील.
गोव्यात अनेक भागांत आरोग्य केंद्रांसाठी चांगल्या इमारती बांधलेल्या आहेत. काही ठिकाणी नव्या इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. बहुतांशी आरोग्य केंद्रांकडे चांगल्या इमारती आहेत, पण सुविधांची वानवा आहे. काही ठरावीक आरोग्य केंद्रांना वगळले तर बऱ्याच आरोग्य केंद्रांमध्ये चांगले उपचार होत नाहीत. पण खोर्ली, पणजीसारख्या आरोग्य केंद्रांमध्ये ज्या पद्धतीने रुग्णांना सेवा दिल्या जातात तशा सेवा राज्यात सर्व तालुक्यांतील किमान एका आरोग्य केंद्रात जरी मिळाल्या तरीही मुख्य इस्पितळांवरील ताण कमी होईल. राज्यात सुमारे २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, चार नागरी आरोग्य केंद्रे, सहा सामुदायिक आरोग्य केंद्रे, चिखली आणि फोंडा येथे दोन उपजिल्हा इस्पितळे, मडगाव आणि म्हापसा येथे दोन जिल्हा इस्पितळे, एक टीबी इस्पितळ आणि बांबोळीत एक गोमेकॉ अशी आरोग्य सुविधांसाठी सरकारी स्तरावर तरतूद आहे. नेहमी सरकारी आरोग्य सुविधांच्या नावाने बोटे मोडली जातात. जिल्हा इस्पितळांसह, गोमेकॉ, टीबी इस्पितळ, उपजिल्हा इस्पितळे आणि काही आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची जी सेवा होते त्याला तोड नाही. काहीवेळा काही आरोग्य केंद्रामध्ये मिळणारे उपचार हे खासगी इस्पितळांच्या तुलनेतही चांगले असतात. फक्त सरकारने या आरोग्य केंद्रांच्या आणि इस्पितळांच्या सुविधांमध्ये, सेवांमध्ये वाढ करायला हवी. सर्वसामान्य जनतेला इथे चांगले उपचार मिळतील, याची काळजी सरकारने घ्यावी लागेल. जी सरकारी इस्पितळे रुग्णांना खासगी इस्पितळांत पाठवतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. जी खासगी इस्पितळे रुग्णांची लुबाडणूक करून शेवटच्या टप्प्यात रुग्णांना गोमेकॉत पाठवतात त्या इस्पितळांवर कारवाई करायला हवी. कारण सरकारी इस्पितळांत चांगल्या सुविधा मिळत असतानाही रुग्णांची आर्थिक लुबाडणूक खुलेआम सुरू आहे. सरकारी इस्पितळांमध्ये चांगले उपचार होत नाहीत असे रुग्णांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न होतो आणि शेवटच्या क्षणी सरकारी इस्पितळातच रुग्णांना पाठवले जाते. गोव्यातील आरोग्य क्षेत्रातील हा गैरप्रकारही थांबवायला हवा.
खोर्लीच्या आरोग्य केंद्राची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. कारण डिजिटल नोंदणी आणि रुग्णांना तपासण्याबाबतचे संदेश तसेच औषधांची यादी या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातून होतात. रुग्णांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती नोंद करून ठेवणे, त्यांना दिलेल्या औषधांची माहिती जमा करून ठेवणे या साऱ्या गोष्टी खोर्ली आरोग्य केंद्रात होत असतात. म्हणूनच तिथे रोज सरासरी शंभर रुग्ण उपचारासाठी येतात. तिथला कर्मचारी वर्गही रुग्णांशी अदबीने वागतो. या आरोग्य केंद्रात मिळणारे उपचार हे एखाद्या इस्पितळाच्या दर्जाचेच आहेत. त्यामुळेच अशा आरोग्य केंद्रांची गोव्याला खरी गरज आहे. खोर्लीच्या आरोग्य केंद्रात ज्या डिजिटल सेवा आणि सुसज्ज उपचार पद्धती आहेत त्या गोव्यातील प्रत्येक तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात दिल्यास गोव्यातील आरोग्य क्षेत्रात ती मोठी क्रांती ठरणार आहे.