
हृदय हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हृदय आपलं काम व्यवस्थित करतं म्हणून आपण सगळे जिवंत आहोत.
आपलं हृदय आकाराने केवढं असतं माहीत आहे? आपल्या हाताचा अंगठा आत घेऊन मूठ बंद करा. जेवढी आपली मूठ आहे तेवढ्याच आकाराचं आपलं हृदय असतं.
हृदय काय काम करतं?
- आपल्या शरीरात हृदय एका पंपसारखं काम करतं आणि शरीराला रक्त पुरवठा करत असतं. अशुद्ध रक्त फुफ्फुसांकडे पाठवतं, फुफ्फुसांमधून आलेलं शुध्द रक्त शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहचवतं.
- या रक्तातून शरीरातील प्रत्येक पेशीला प्राणवायू आणि पोषण मिळतं आणि म्हणून त्या पेशी, अवयव आपापले काम नीट करू शकतात.
- हे काम हृदय दिवस रात्र करत असतं, आपण झोपतो तेव्हा सुद्धा.
- म्हणून आपण पुढील प्रमाणे हृदयाची काळजी घेतली पाहिजे
- रोज रात्री ७:३० वाजेपर्यंत रात्रीचे जेवण केले पाहिजे.
- जेवताना टीव्ही, मोबाईलमधील व्हिडिओ बघू नये.
- डाळिंब, करवंदं, बोरं, आंबा ही आंबट - गोड असलेली फळं खावी.
- मासे, चिकन, अंडी यासारखे पदार्थ जेवणात असतील तेव्हा जेवणानंतर सोलकढी प्यावी.
- कोल्ड्रिंक्स, समोसा, वडा इ. तळलेले पदार्थ, पनीर, चीज, चिकन, मिठाई, केक, बिस्कीट इ. खूप व रोज खाऊ नये.
- रोज थोडा-थोडा व्यायाम करावा.
- खूप मोठ्याने ओरडणे, रडणे, भांडणे, राग, चीडचीड करणे टाळावे.
सोपं आहे ना हे सगळं करणं? आपल्याला हृदयाचे आजार होऊ नये म्हणून त्याची काळजी कशी घ्यावी हे सर्वांना सांगण्यासाठी दि २९ सप्टेंबर रोजी 'जागतिक हृदय दिन' साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हृदया विषयीची ही माहिती तुमच्या मित्र मैत्रीणींनाही सांगा.