एकदा काय गंमत झाली.. दिवस होते उन्हाळ्याचे. उन्हाळ्याची सुट्टी चाललेली. बनी सश्याच्या घरात एक सावरीचा कापूस वार्याने उडत उडत आला. बनी सश्याचं टिल्लू नावाचं धाकटं पिल्लू त्यांच्या बिळाच्या खिडकीपाशी खेळत होतं. तेवढ्यात तो सावरीचा कापूस त्याच्या पुढ्यात येऊन अलगद विसावला. टिल्लूला फार गंमत वाटली. त्याने इकडे बघितलं, तिकडे बघितलं आणि तो त्या गोळ्याकडे बघत राहिला. त्याला त्याचं खूपच कौतुक वाटलं. त्याला वाटलं की हे एक पान आहे. किती छान आणि वेगळं पान आहे हे! आणि कसं काय हे इथं उडत उडत आलं? त्याला या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं. मग त्याने जरास्सं खिडकीच्या बाहेर डोकावून पहिलं तर समोर एवढं मोठ्ठं पिंपळाचं झाड, बाजूला आंब्याचं झाड, त्याबाजूला पळस अशी वेगवेगळी झाडं त्याला दिसली. त्या सगळ्या झाडांची पानं तर मोठी, हिरवीगार होती. त्याला काहीच कळेना. या झाडांपैकी कुठल्या झाडाचं पान असेल बरं हे? त्याने खूप विचार केला पण त्याला काही कळेच ना!
मग टिल्लू गेला आपल्या आईपाशी. आई स्वयंपाकघरात गाजराचा हलवा करण्याच्या तयारीत होती. टिल्लूला गाजराचा हलवा खूप आवडायचा, म्हणून आज तिने खास बेतच केलेला. आई गाजर किसत असताना टिल्लू तिच्यापाशी गेला आणि आईला म्हणाला, "आई, आई, हे बघ गं कसलं पान. एवढुस्संच तर आहे आणि कसं उडत उडत आपल्या खिडकीत येऊन पडलं! कसलं गं आई हे पान? मी बाहेर डोकावून बघितलं तर एकही झाड अश्या पानांचं दिसलं नाही बुवा!" आईला हसूच आलं. 'असा कसा हा वेडुला' म्हणत तिने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, "अरे वेडू हे नं पान नाही काही, हा आहे कापूस. सावरीचा. आणि याचं झाड आपल्या जवळ इथे नाहीये काही, ते किट्टी मावशीचं बिळ नाही का दोन झाडं सोडून... त्याच्या पल्याड आहे हे झाड. हा हलकासा कापूस वार्याने उडत उडत आपल्याकडे आला बघ! तुला नेईन हो दाखवायला ते झाड."
टिल्लूची उत्सुकता वाढली. "हे पान नाही तर मग आहे तरी काय गं? फूल तर वाटत नाही! आणि फळ तर मुळीच नाही! खाऊन बघू का?" असं आपल्या मनाशीच म्हणत टिल्लूने कापूस खायला तोंड उघडलं. तेवढ्यात आईने त्याला थांबवलं. "अरे, अरे, असं नाही काही! फळ नाहीये हे. खायचं नसतं काही हे! काटेसावर नावाचं नं एक झाड असतं. त्याला दोडक्यासारखी बोंडे येतात. त्यात हा कापूस असतो. ती बोंडे फुटली की त्यातला कापूस सगळीकडे उडतो. यात नं छोट्या छोट्या काळसर चॉकलेटी रंगांच्या बिया असतात. त्या बिया नं, इकडे तिकडे फिरून मातीत टाकायच्या. मग पावसात नं त्यातून अजून झाडं उगवतील. आहे की नाही मज्जा? या उन्हाळ्याच्या सुट्टीत हे काम कर हं म्हणजे तुला अजून कापूस मिळेल." टिल्लूने मान हलवली आणि त्याचे लालेलाल डोळे अजूनच चकाकले. आता टिल्लूची स्वारी खूश झाली आणि घराच्या बाहेर अजून कापूस मिळतोय का ते शोधू लागली.