माझा नाट्य-रंग प्रवास

Story: गोमंतकीय रंगभूमी | श्रीधर कामत बांबोळ� |
24th September, 03:21 am
माझा नाट्य-रंग प्रवास

कर्ण पर्व नाटकाच्या पाचव्या अध्यायाचा देखावा महाभारतात कुंतीच्या महालात दाखवलेला आहे. अर्जुन कुंतीकडे क्षमा याचना करतो. आपण आईकडे आशीर्वाद नव्हे, तर प्रायश्चित घेण्यासाठी आलो असल्याचे सांगतो. यावर कुंती अर्जुनाला त्याचा धर्म क्षत्रिय असल्यामुळे खंत करण्याचे कारण नसल्याचे सांगते. त्याने केलेल्या पराक्रमाचे कौतुक करते. पण ते कोणाच्या भल्यासाठी? कोणाचे चांगले झाले? असे प्रश्न अर्जुन कुंतीसमोर मांडतो तेव्हा 'फ्लॅशबॅक' पद्धतीने कृष्ण आणि कुंतीचा प्रसंग लेखकाने मांडलेला आहे. या प्रसंगात कृष्ण कुंतीला कर्णाच्या जन्माचे लोकांना कोडेच असल्याचे सांगतो. कर्णाच्याही मनात या कोड्याचे मूळ आहे. जन्माला येतानाच आपल्याला नदीत सोडले, आपली कवचकुंडले ही क्षत्रियाची खूण होती इतकेच त्याला माहीत आहे.

आपण सुतपुत्र नाही असे त्याला वाटते. परंतु मी कोण? हा प्रश्न सुटत नाही. त्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले तर तो बदलू शकतो. मोठ्या कुळातल्या क्षत्रिय आईने आपल्या कुमारीपणातला मुलगा म्हणून कर्णाला कुशीत घेतला तर हे घडू शकते. म्हणून हे धाडस करण्याचे काम कृष्ण कुंतीला सांगतो. कौरव - पांडवांचे युद्ध टाळण्यासाठी हा कलंक आपल्या डोक्यावर घेण्यास ती शेवटी तयार होते. "जिथे विचारांचे आणि शुरांचे बळ कमी पडते, तिथे आईच्याच मनाचे बळ तारते" असे सांगून कृष्ण तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. शेवटी ती कर्णाकडे जाण्यास दुःखी मनाने तयार होते. 'फ्लॅशबॅक' संपल्यावर परत तिथेच कुंती म्हणते, "फुलां पुंजावंक गेल्ली हांव, होटींत कांटेच घेऊन आयली. व्यर्थ गेला माझा प्रयत्न. दान मागितले संहार टाळण्याचे आणि कर्णने भिक घातली पुत्रांच्या प्राणांची! युद्ध टळले नाही, कलंक मात्र राहिला कपाळावर."

 आजवर कर्णाच्या जन्माच्या कहाण्या/मिथके आणि आपण वाचल्यात, ऐकल्यात पण कर्णपर्व नाटकात उदय भेंब्रेंनी त्याला एक वेगळा आयाम दिलेला आहे. नाटकातली सगळी पात्रे वास्तवदर्शी दिसतात. या नाट्यकृतीत महाभारतातल्या संस्कृत नाट्यपरंपरेप्रमाणे कथा उपकथांचा आधार आहेच पण काही काल्पनिक प्रसंगांचाही समाविष्ट आहे. तो तर्कनिष्ठ आहे. इथेच लेखकांची सृजनशीलता उठून दिसते. एक विचार करण्यास लावणारे सत्य त्यांनी रसिकांसमोर मांडलेले आहे. उदयबाब स्वतः नाटकात अभिनय करणारे एक कलाकार. हा अनुभव त्यांना संवाद घटमुट, मुद्देसूद करण्यास आधारभूत ठरलेला आहे

 'कर्णपर्व' नाटक वाचण्यापेक्षा प्रयोग पाहण्यात अधिक मजा आहे. अर्थात सृजनशील, कल्पक दिग्दर्शक व तितक्याच ताकदीचा नाट्य संच लाभल्यास ही नाट्यकृती प्रभावी होऊ शकते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नाटक हे 'दृक-श्राव्य-काव्य' माध्यम आहे. 'कर्णपर्व' नाटक कोंकणी रंगभूमीचा एक मैलाचा दगड म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाभारतातल्या आणि रामायणातल्या कितीतरी घटना व व्यक्तिरेखा नाट्य माध्यमातून कोंकणी रंगमंचावर यायला पाहिजे होत्या ते झालेले नाही. उदयबाबांनी 'कर्णपर्वा'च्या रूपाने चांगले उदाहरण दिले आहे. कोंकणी रंगभूमीवर या नाट्यकृतीची प्रेरणा घेऊन अशा तऱ्हेचे प्रयत्न होणार अशी आशा बाळगतो.

गुण दोषाचे रथी महारथी

रक्त रंगी रंगले

हे कर्णपर्व... हे कर्णपर्व...

मी दिग्दर्शित केलेल्या 'कर्णपर्व' या नाटकाचा पहिला प्रयोग श्री संस्थान पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या २२५ व्या स्थापना दिनी सादर करण्यात आला. नाटकाची निर्मिती अंत्रुज लळीतक - बांदोडे - गोवाकडून करण्यात आली. नाटकाचा द्वितीय प्रयोग अंत्रुज लळीतकच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ३० एप्रिल, २००० या दिवशी नागेशी येथील सौंदेकर मैदानावर उभारलेल्या रंगमंचावर सादर करण्यात आला.

 कर्णपर्व नाटकातील भूमिका व कलाकार :

 राधाकृष्ण बांबोळकर (ध्रुतराष्ट्र), उमेश नाईक आणि दामोदर वझे (दुर्योधन), विजयकांत नमशिकर (भीष्म) , सुशांत सरदेसाई (द्रोणाचार्य), श्रीकांत (दारूका), नरेंद्र नाईक (विदुर), वीणा गावणेकर (गांधारी), रूपा च्यारी (द्रौपदी), कलानंद बांबोळकर (पर्यवेक्षक), अजित कामत (कर्ण), समीर दाते (श्रीकृष्ण), अरुण गावणेकर (अर्जुन), उदय तिळवे (शकुनी), एकनाथ नाईक (दुश्यासन), दिलीप गावडे (भीम), प्रतिमा चोडणकर (कुंती), प्रथमेश नमशिकर (पर्यवेक्षक), शोधन बांबोळकर आणि दीपा नमशिकर (दासी), देविदास खेडेकर, सुनील, देवेंद्र, मोहन, शाम, राजेश, घनश्याम, सुरेश, रामदास आणि अशोक (घोडेमोडणी कलाकार).

 सुबोध कुर्पासकार, रामदास कुर्पासकार, संजीव कुर्पासकार, गोविंद नाईक, जगन्नाथ परवार, दामोदर वझे, नारायण नाईक, संदेश वझे, दक्षता नमशिकर, रूपाली नाईक, नित्यानंद नाईक, राजेंद्र नमशीकर, दत्ताराम बांबोळकर, सुखानंद कुर्पासकार, मनोज बांदोडकार, जितेंद्र शिकेरकार आणि गीता बांबोळकर (निर्मिती आधार)