मोहम्मद शमीचा कांगारूंना ‘पंच’

ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव : टीम इंडियाची १-० आघाडी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
23rd September 2023, 12:03 am
मोहम्मद शमीचा कांगारूंना ‘पंच’

मोहाली : येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २७७ धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केले. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली.
या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे. आयसीसीने पोस्टर पोस्ट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दणक्यात सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी १४२ धावांची दमदार सलामी दिली. ऋतुराज आणि गिल यांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचा समाचार घेतला. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली. भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण, त्याचवेळी अॅडम झम्पाने ऋतुराज गायकवाडला तंबूत पाठवला. ऋतुराज गायकवाडने ७७ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या खेळीत ऋतुराजने दहा चौकार मारले. ऋतुराज बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर लगेच धावबाद झाला. त्यानंतर गिलला झम्पाने तंबूत पाठवले. गिलने ६३ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दहा धावांत भारताने तीन विकेट लागोपाठ गमावल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर इशान किशन आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, पॅट कमिन्सने ही जोडी फोडली. इशान किशनला १८ धांवावर कमिन्सने बाद केले.
किशन बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि सूर्या यांनी ऑस्ट्रेलियाचा समाचार घेतला. सुरुवातीला दोघांनी संयमी फलंदाजी केली. एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर दिला. पण त्यानंतर चौकार-षटकार ठोकले. सूर्यकुमारने दमदार अर्धशतक ठोकले. सूर्यकुमार आणि केएल राहुल यांच्यामध्ये ८० धावांची भागिदारी झाली. सूर्यकुमारने पाच चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी केली. सूर्या बाद झाल्यानंतर केएल राहुलने फिनिशिंग टच दिला. राहुलने कर्णधाराला साजेशी खेळी करत ६३ चेंडूत नाबाद ५८ धावा काढल्या. यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय सीन एबॉट आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलिया टॉस जिंकून बॅटिंगसाठी मैदानात आली. ऑस्ट्रेलियाने ४९.५ षटकांत सर्वबाद २७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच षटकात झटका दिला. शमीने मिचेल मार्श (४) ला बाद केले. त्यानंतर टॉप ऑर्डरमध्ये मिचेलचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही या सुरुवातीचा फायदा घेत मोठी खेळी साकारता आली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या कांगारूंना वेळीच मोठी खेळी करण्यापासून रोखले.
स्टीव्हन स्मिथ ४१ धावा करून माघारी परतला. मार्नस लबुशेनने ३९ धावांचे योगदान दिल‍े. कॅमरुन ग्रीनने ३१ धावा जोडल्या. जोस इंग्लिसला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र, त्याआधीच बुमराहने त्याचा काटा काढला. बुमराहने इंग्लिसला ४५ धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मार्कस स्टोयनिसने २९ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट २ धावांवर बाद झाला. सिन एबोर्ट आणि एडम झम्पा दोघांनी प्रत्येकी २-२ धावांचं योगदान दिले. तर अखेरीस सिन एबोटने नाबाद २१ धावांचे योगदान दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २५० पेक्षा अधिक धावा करता आल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने १० षटकांत ५१ धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

शमीची झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी
मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ५ विकेट घेण्यात यशस्वी ठरला. शमीने संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणले. १६ वर्षांनंतर शमी घरच्या मैदानावर ५ विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याआधी २००७ मध्ये झहीर खानने मारगावमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून ४२ धावांत ५ बळी घेतले होते.
..........
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट्स
५/४३ - कपिल देव, ट्रेंट ब्रिज, १९८३
६/४२ - अजित आगरकर, मेलबर्न, २००४
५/५१ - मोहम्मद शमी, मोहाली, २०२३