अंडर १९ वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर

१३ जानेवारीला प्रारंभ; २४ फेब्रुवारीला अंतिम सामना

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
23rd September 2023, 12:01 am
अंडर १९ वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेची सर्वत्र लगबग सुरू असतानाच आयसीसीने अंडर १९ वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. अंडर १९ वर्ल्ड कपचे यजमानपद हे श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेचा थरार एकूण २३ दिवस रंगणार आहे. स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर ४ फेब्रुवारीला अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. या संघांना एकूण ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.
टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये
टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासोबत ए ग्रुपमध्ये आयर्लंड, अमेरिका आणि बांगलादेशचा समावेश आहे. बी ग्रुपमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडिज आणि स्कॉटलँड टीम आहे. सी ग्रुपमध्ये श्रीलंका, झिंबाब्वे, नामिबिया आणि ऑस्ट्रेलिया आहे. तर डी ग्रुपमध्ये नेपाळ, पाकिस्तान अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड टीम आहे.
प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील ३ संघांविरुद्ध खेळेल. त्यानंतर प्रत्येक ग्रुपमधून ३ टीम अशा एकूण १२ टीम सुपर १२ मध्ये पोहचतील. त्यानंतर हे १२ संघ २ ग्रुपमध्ये ६-६ नुसार विभागले जातील. सुपर ६ मध्ये ग्रुप ए आणि ग्रुप डी मधील एकूण ६ संघांना एका ग्रुपमध्ये ठेवले जाईल. तर ग्रुप बी आणि ग्रुप सीमधील एकूण ६ संघ एका ग्रुपमधील असतील.
सुपर ६ राऊंडमध्ये प्रत्येक टीम २ मॅच खेळेल. या सुपर ६ मधील टीम दुसऱ्या ग्रुपमधील २ संघाविरुद्ध खेळेल. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये एक नंबर असलेली टीम ही ग्रुप डीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानवर असलेल्या संघांविरुद्ध खेळेल. याच पद्धतीने ग्रुप एमध्ये दुसऱ्या स्थानी असणारी टीम डी ग्रुपमधील पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघाविरुद्ध खेळेल.
५ स्टेडियममध्ये होणार वर्ल्डकप
श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियम, पी सारा ओवल, कोलंबो क्रिकेट क्लब, सिंहली स्पोर्ट्स आणि नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट कल्ब या ५ स्टेडियममध्ये वर्ल्डकपचे सामने पार पडणार आहेत.
स्पर्धेतील टीम इंडियाचे सामने
टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना रविवार, १४ जानेवारी रोजी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात १८ जानेवारीला यूएसएचे आव्हान असणार आहे. तर टीम इंडियाचा तिसरा आणि साखळी फेरीतील अखेरचा सामना हा शनिवार, २० जानेवारी रोजी आयर्लंड विरुद्ध होणार आहे.