समाजाला टोचणारे, भेदभावाचे काटे

Story: पालकत्व | पूजा शुभम कामत सातोस्कर |
23rd September 2023, 03:18 am
समाजाला टोचणारे, भेदभावाचे काटे

गेल्या दिवसात समाजातील जातीबाबत जो संघर्ष झाला, त्यातून आपल्या मुलांवर कसे संस्कार होतील, त्यांचा भविष्यात कोणता दृष्टिकोण बनेल ह्याची खबरदारी आपण घ्यायला हवी. आपल्या समाजात हिंदू, ख्रिस्ती, मुस्लीम इ. जे जातीवाद होत आहेत, ते तथ्यहीन मुद्दे आहेत, ते काही दिवसांनी विसरले देखील जातील पण याचा नकारात्मक परिणाम जो आपल्या मुलांच्या मनावर कायमस्वरुपी होणार आहे याबाबत आपण कधी विचार केला आहे का, जेव्हा जेव्हा आपल्या समाजात अशा लज्जास्पद घटना घडतात, त्यावेळी त्याच्या प्रभावाबाबत नक्कीच, पालकांनी सतर्क राहून मुलांना मार्गदर्शन केले पाहिजे. वर्तमानकाळात ज्यापध्दतीने जातीभेदाबाबत विविध घटना समोर येत आहेत, ज्यामुळे बालवयातच जातीविषयक मुलांच्या मनातील भेदभाव नष्ट व्हावा याकरीता आपण प्रयत्नशील रहायला हवे.

स्वत: आदर्श उदाहरण बनावे

लहानपणापासूनच इतरांचे अनुकरण करताकरता मुले खूप काही शिकतात. त्यामुळे अनुकरणाच्या बाबतीत मुलांचा विशेष केंद्रबिंदू पालक व गुरु असतात. त्यामुळे ह्या दोघांवर मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची जबाबदारी असते. पालक व गुरु मुलांना ज्ञानी बनविण्याचे काम करतात. म्हणूनच सर्वात प्रथम स्वत:मधील दोष नष्ट करावे. कारण आपलीच जर मानसिकता चुकीची असेल तर योग्य दृष्टिकोणाचा आरसा आपण मुलांना दाखवू शकणार नाही.

सर्वांप्रती समानतेचा भाव

आपण पालकांनी आपल्या मुलांना ही शिकवण द्यायला हवी, की जाती हा जो विषय आहे, तो मानवानेच निर्माण केला आहे. आम्ही सर्व मनुष्य, तसेच पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव निर्जीव परमेश्वरानेच निर्माण केला आहे. आम्ही सगळी एकाच परमात्म्याची मुले आहोत. प्रत्येकाचे श्रध्दास्थान वेगवेगळे जरीही असले तरी देखील आपण प्रत्येक व्यक्तीला समानतेच्या दृष्टीने पहावे, जगात अस्तित्त्वात असलेल्या प्रत्येक धर्मपंथाला समान मान सन्मान द्यावा. आणि प्रत्येक धर्मातील सणवारांना समान महत्त्व द्यावे कारण गणेश चतुर्थीच्या वेळी, बाप्पांचे मनमोहक रुप पहाण्याचा सर्वांना अधिकार असतो, नाताळ सण सगळीजणे साजरा करतात. त्यामुळे कुठल्याही जातीधर्माकडे भेदभाव करु नये. समानतेच्या धर्माचे अनुकरण करावे.

जातीविषयक घडणाऱ्या घटनांचा दुष्परिणाम टाळावा

प्रत्येक व्यक्तीबाबत जर आपल्या मनात प्रेमाची, आपुलकीची भावना असेल, तर मग भेदभावाची संकल्पनाच उद्भवत नाही. परंतु, आजकाल एकामागून एक घडत असलेले प्रसंग पाहता, मुलांना वेळीच योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. जातीमधील भेदभावाची प्रत्यक्षात घडलेली घटना असो वा टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या काल्पनिक घटना, ह्या घटनांपासून मुलांना शक्य तितके दूर ठेवावे. जर ह्या घटनांचा त्यांना सुगावा लागलाच, तर मुलांना त्यात नेमके काय चुकीचे आहे हे समजवावे. कुठल्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ मुलांनी लावू नये, ह्याची खबरदारी घ्यावी. माणूस नाही, तर मानसिकता चुकीची आहे ह्याची जाणीव मुलांना होणे अत्यंत गरजेचे आहे.

निरीक्षणाचा प्रभाव

बहुतेकदा मुलांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी, घरात पालक प्रयत्नशील असतील, पण शाळेत कोण काय विचार करेल, कोण कसा वागेल, कोण कसे बोलेल, ह्यावर पालकांचे नियंत्रण नसते. त्यामुळे अनेकदा भेदभावाचे मुळ शाळेत घातले जाते. आपल्या मित्रमंडळीकडून मुले जे ऐकतात, जे वर्तन बघतात, त्याचा मुलांवर इतका प्रभाव होतो, की मुले अनेकदा आपल्या घरी येऊन शब्दांचे वा क्रियेचे अनुकरण करतात. आपल्या मुलांची वागणूक, त्यांच्या स्वभावाशी माता पिता पूर्ण परिचित असतात, त्यामुळे ही पालकांची जबाबदारी आहे की, त्यांनी मुलांच्या भाषेतील वा वागणुकीतील अचानक आलेला बदल नजरअंदाज न करता योग्य वेळीच मुलांना योग्य अयोग्यामध्ये भेद करण्यास सांगावे. 

जातीमधील भेदभाव हा समाजावर एक अन्याय आहे, जो आपण स्वत: करु नये व सहन सुध्दा करु नये. जर समाजात कुणी व्यक्ती असा भेदभाव करत असेल तर त्याला त्याच्या चुकीची जाणीव करुन द्यावी ही मुख्य शिकवण  पालकांनी मुलांना द्यावी.

प्रत्येकाला ही जाणीव नक्कीच असावी, की प्रत्येक व्यक्ती हा सर्वात आधी मानवतेच्या धर्माशी जोडलेला आहे. भक्ती करण्याचे माध्यम प्रत्येकाचे वेगवेगळे असले तरी देखील हृदयातील ईश्वरभक्तीला कुठलीही मर्यादा नसते व त्यावर कुठल्याही प्रकारची बंधने देखील नसतात. त्यामुळे नक्कीच ह्या मुद्द्यावर प्रत्येकाने  विचार करावा.