हरमल परिसरात भुरट्या चोरांचा उच्छाद

मंदिरात चोरी झाल्यामुळे नागरिकांत भीती

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
18th September, 09:44 pm
हरमल परिसरात भुरट्या चोरांचा उच्छाद

हरमल : येथील खालचावाडा भागात ऐन चतुर्थीच्या काळात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी रात्री पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांनी खालचावाडा येथील श्री नारायणदेव मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केला व फंडपेटीचे कुलूप हत्याराने फोडण्याचा प्रयत्न केला. देवस्थानात असलेल्या माईकच्या स्टँडने कुलूप फोडून रोख अंदाजे २ हजार रुपये लंपास केल्याची माहिती देवस्थान अध्यक्ष तारी यांनी दिली. चोरांनी लंपास केलेल्या रकमेतील काही पैसे तीन ठिकाणी पडल्याचे आढळून आले. त्यानंतर चोरांनी श्री विठ्ठल रखुमाई मांगरात प्रवेश केला. तेथील काही रोख रक्कम लंपास करण्यात यश मिळवले.
या प्रकरणी हरमल आऊट पोस्टच्या पोलिसांनी पंचनामा केला.
दरम्यान, देवस्थानचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने अध्यक्ष तारी यांनी खेद व्यक्त केला. सीसीटीव्ही दुरुस्त करून घेण्याची सूचना पोलिसांनी देवस्थानच्या अध्यक्षांना केली.
सध्या या भागात परप्रांतीय मजुरांची संख्या वाढत असल्याने टेहळणी करून त्यांनी पहाटे संधी साधली असावी, अशी शक्यता आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी व प्रत्येक नाक्यावर तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ऐन चतुर्थी काळात झालेल्या या घटनेमुळे नागरिक तसेच गृहिणींत भीतीचे वातावरण पसरले आहे.