आंबे-दाबाळवासीय यंदा फेडणार फुटब्रिजचा ‘नवस’

मात्र जोडरस्त्याचे विघ्न दीड वर्षानंतरही सुटेना...

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th September 2023, 07:00 am
आंबे-दाबाळवासीय यंदा फेडणार फुटब्रिजचा ‘नवस’

आंबे-दाबाळ येथे उभारण्यात आलेला पदपूल.

फोंडा : आंबे-दाबाळ गावांना जोडणारा पदपूल उभारून दीड वर्ष उलटले तरी अजून जोडरस्ता तयार केला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पदपुलामुळे जीव मुठीत घेऊन होडीतून केला जाणारा प्रवास बंद झाला आहे. गावातील लोकांसाठी नदीवर पदपूल उभारल्यास ५ दिवस गणेशाची सेवा करण्याचा केलेला नवस फेडण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहे. पण अजूनही पदपुलाचा चांगला वापर करण्यात मिळत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.


दाबाळ गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबे गावात जाण्यासाठी दूधसागर नदी पार करावी लागत होती. पावसाळ्यात ग्रामस्थांना दूधसागर नदी पार करण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागत होता. जीव मुठीत घेऊन होडीतून प्रवास करावा लागत असल्याने पावसाळ्यात लहान मुलांना दाबाळ येथील शाळेत पाठविण्यात येत नव्हते, तर काही जण मुलांना शिक्षणासाठी नातेवाईकांच्या घरी ठेवत होते. त्यासाठी ग्रामस्थ नदीवर पदपूल उभारण्याची मागणी सरकारकडे करत होते. पदपूल उभारून दिल्यास गणेशाची ५ दिवस सेवा करण्याचा नवस ग्रामस्थांनी यापूर्वी केला होता. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन सरकारने अंदाजे १० कोटी रुपये खर्च करून पदपूल उभारला. दि. २० मे २०२२ रोजी पदपुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी राजकीय नेत्यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत दोन्ही बाजूंनी पदपुलाला जोड रस्ता उभारून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. परंतु जोडरस्ता तयार करण्याची प्रक्रिया अजून सुरू करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पदपूल उभारण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पदपुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेले बागायतदार आंबे गावातील ग्रामस्थासाठी जोडरस्त्यासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी अजूनही तयार आहेत. परंतु काही बागायतदार परवानगी देत नसल्याची अफवा पसरवत आहेत. कारण पदपुलाच्या उद्घाटन वेळी दोन्ही बाजूंनी असलेल्या बागायतदारांना आमंत्रित करण्याचे धाडस कोणीच केले नव्हते. त्यामुळे पदपुलाच्या उद्घाटनानंतर १६ महिने उलटले, तरी प्रक्रिया सुरू करण्यात अधिकारी वर्ग रस दाखवत नसल्याचे दिसून येते. यात राजकारणसुद्धा असण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

पुलाचा नवस फेडण्यासाठी ग्रामस्थ सज्ज
नदीवर पदपूल उभारून दिल्यानंतर होडीचा प्रवास इतिहासजमा झाला. गावातील लोकांची मागणी पूर्ण झाल्यानंतर गणेशाची ५ दिवस सेवा करण्याचा नवस ग्रामस्थांनी केला होता. गेल्या वर्षी काही अडचणीमुळे ग्रामस्थांनी गणेशाचे दीड दिवसात विसर्जन केले. पण यावर्षी नवस फेडण्यासाठी आंबेवासीय सज्ज आले असून चतुर्थीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

गावातील लोकांना सातवणारा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने पदपूल उभारल्यास ५ दिवस गणेशाची सेवा करण्याचा नवस ग्रामस्थांनी केला होता. यावर्षी नवस फेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने जोडरस्त्याचे काम पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत निश्चित दखल घेऊन ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्याची खात्री आहे.
- राजू कुर्टीकर, स्थानिक