मुंगीएवढा राग, हत्तीएवढी समज

Story: छान छान गोष्ट। ©सोनचाफा |
17th September 2023, 12:34 am
मुंगीएवढा राग,  हत्तीएवढी समज

एकदा एक मुंगी पाय घसरून नदीत पडली. खूप धडपड करून तिला एक पान मिळालं. आता पान हातापायाने वल्हवत नदीच्या तीरावर पोहोचू असा विचार करत ती त्या पानावर जाऊन बसते तोवर एक मोठ्ठा हत्ती तिथे अंघोळीसाठी आलेला तिला दिसला. 'आता हा आणखीन कशाला आलाय इथे पाणी गढूळ करायला? याच्या धक्क्याने मी पुन्हा पाण्यात पडले तर पुन्हा हातपाय मारून माझा जीव जायचा!' असा विचार करून मुंगीला राग आला. ती मोठ्ठयाने ओरडली, "ए हत्ती दादा, तुला दिसतंय ना मी इतकी दमलेय ती, कशाला येतोयस अंघोळीला? मला त्रास द्यायला मुद्दाम तू अंघोळीला नदीवर आलायस ना?" रागात ती भराभर हत्तीला खूप खूप ओरडत होती.

हत्ती बिचारा शांत नदीच्या काठावर बसला. त्याने तिचं सगळं ऐकून घेतलं. ती बडबडायची शांत होताच हत्तीने हळूच ते पान अलगद सोंडेत धरलं आणि हळूच मुंगीसकट ते पान काठावर आणून ठेवलं. मुंगी आधी घाबरली आणि नंतर हत्तीने पान काठावर ठेवताच तिला अगदी हायसं वाटलं. पटापट पानावरून खाली उतरून ती जमिनीवर आली आणि हत्तीला म्हणाली, "हत्ती दादा, हत्ती दादा, मला माफ कर. मी तुला खूप रागारागात आगाऊपणाने बोलले. तू मात्र माझ्यावर अजिबात रागवला नाहीस. उलट माझी मदत केलीस."

हत्ती छान हसला आणि म्हणाला, "मुंगी बाई, माफी अजिबात मानू नकोस. तुझा थोडासा गैरसमज झाला. मी तुला काही त्रास द्यायला म्हणून इथे नव्हतो आलो. तू बोललीस ते तू रागात होतीस म्हणून. पण म्हणून काही मी ते मनाला लावून नाही घेतलं. तुझ्यासारखा तेव्हा मीही रागावलो असतो तर आपल्यात भांडणं झाली असती. मी शांत राहिलो म्हणून तुला थोडी मदत तरी करू शकलो. रागावर प्रेमाने विजय मिळवता येतो तो असा."

मुंगीला हत्तीचं म्हणणं पटलं. तिने हसून त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे केला आणि हत्तीने तो हसत हसत स्वीकारला.