लहान मुलांचे एक स्वप्न पायलट होणे हे असतेच. पण विमानात प्रवास करणे हे सगळ्या मुलांच्या नशीबात नसते. अशा वेळी जवळून विमान बघायचे असल्यास काय करता येईल? एक उपाय आहे. तो म्हणजे नॅव्हल एव्हिएशन म्युझियम. हे भारतीय नौदल हवाई दलाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे वास्को येथून सहाकिलोमीटर अंतरावर बोगमाळो येथे असलेले लष्करी विमानचालन संग्रहालय आहे. हे आशिया खंडातील एकमेव असे संग्रहालय आहे.
हे संग्रहालय दोन मुख्य भागांमध्ये विभागलेले आहे, एक बाह्य प्रदर्शन आणि दोन मजली इनडोअर गॅलरी. इनडोअर गॅलरीमध्ये विशिष्ट विषयांवर लक्ष केंद्रित केलेल्या खोल्या आहेत. यामध्ये नौदल शस्त्रास्त्रांचा समावेश होतो. जसे की, बॉम्ब, टॉर्पेडो, ऑटो कॅनॉन आणि सेन्सर्स आणि भारतीय हवाई आणि नौदल दलांच्या गणवेशाची प्रगती. INS विक्रांत आणि INS विराटचे मोठे मॉडेल प्रदर्शनात आहेत. तसेच खूप विमाने बाहेर प्रदर्शनात आहेत.
एका गॅलरीत अनेक शस्त्रास्त्रे व्यवस्थित प्रदर्शनात आहेत. येथे तुम्ही टॉर्पेडो, वेगवेगळ्या आकाराचे बॉम्ब, रॉकेट, वॉर हेड, क्षेपणास्त्रे इत्यादींशी जवळून संपर्क साधता. सुरक्षा कक्षामध्ये नौदलाच्या जवानांनी समुद्रात आणि हवेत असताना कोणत्याही धोक्याच्या आणि प्रसंगाच्या वेळी वापरलेले विविध उपकरणे आणि संरक्षण उपकरणे प्रदर्शित करण्यात आली आहेत. फ्लोटिंग डिंगी, पॅराशूट, फायटर पायलटची इजेक्शन सीट, पायलटचा पोशाख इ.
चला तर, एकदा तरी याला भेट द्याच. तुमचे बाल-मन अवश्य उडणार.