भारतात पहिल्याच दिवशी १२.५० कोटींची कमाई
'मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन' हा हॉलिवूड चित्रपट बुधवारी, १२ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. टॉम क्रूझच्या या चित्रपटाला भारतीय बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. ख्रिस्तोफर मॅक्वेरी दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी खळबळ माजवली असून, हा चित्रपट दीर्घ खेळी खेळण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट संपूर्ण भारतात १० कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षेपलीकडे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाई केली.
भारतात पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई
रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर १२.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. टॉम क्रूझचा मागील चित्रपट 'मिशन: इम्पॉसिबल फॉलआउट' २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ९.२५ कोटींची ओपनिंग केली होती. त्यानुसार नवीन भागाने पहिल्याच दिवशी अप्रतिम कलेक्शन केले आहे.
५ दिवसांत कमावणार २ हजार कोटी?
'मिशन इम्पॉसिबल ७' उत्तर अमेरिकेत ८५ ते ९० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ६९८ ते ७४० कोटी रुपये गोळा करू शकतो. त्यानुसार, रिलीजच्या पहिल्या ५ दिवसांत त्याचे आंतरराष्ट्रीय कलेक्शन १६० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १३१३ कोटी रुपये होईल. यामुळे, चित्रपटाची ग्लोबल ओपनिंग २५० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे २०५१ कोटी असू शकते.