४३.६८ टक्के दूध उत्पादकांना २३.९१ कोटींची कर्जे !

किसान क्रेडिट कार्ड घेणाऱ्या शेतकऱ्यांत वाढ; सरकारी अहवालातून समोर


29th May 2023, 12:43 am
४३.६८ टक्के दूध उत्पादकांना २३.९१ कोटींची कर्जे !

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : राज्यातील दूध उत्पादक २,२८८ शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत २३.९१ कोटींचे कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. ४३.६८ टक्के दूध उत्पादकांपर्यंत किसान क्रेडिट कार्ड पोहोचल्याची माहिती राज्य सरकारच्या एका अहवालातून समोर आली आहे.   

राज्यातील शंभर टक्के पात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्याचे प्रयत्न सरकारच्या पशुसंवर्धन खात्याकडून सुरू आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत ४३.६८ टक्के दूध उत्पादक शेतकऱ्यांना कार्ड देण्यात आले असून, या शेतकऱ्यांना विविध बँकांकडून २३.९१ कोटींचे कर्जही मिळालेले आहे, असे अहवालात म्हटले आहे. पशुसंवर्धन खात्याकडे आणखी १२६ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. खात्याने दोघांचे अर्ज फेटाळले असून, एकाने अर्ज स्वत:हून मागे घेतला आहे, असे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.       

दरम्यान, राज्य सरकारच्या मत्स्योद्योग खात्याकडूनही मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येत आहे. खात्याने आतापर्यंत पात्र असलेल्या ६८३ (३३.३१ टक्के) शेतकऱ्यांना कार्डचा लाभ मिळवून दिला आहे. तर, ५२५ अर्ज अद्यापही प्रलंबित असल्याचे अहवालात म्हटले आहे.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड?      

कृषी उत्पादन अनेक गोष्टींवर अवलंबून असते, ज्यामध्ये हवामान हा प्रमुख घटक आहे. अनेकवेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते.       

शेतकरी खासगी संस्थांकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात, मात्र नंतर त्यांच्यावर हप्त्यांचे ओझे वाढू शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली.       

किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. ७५ वयापर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात.  

आवश्यक कागदपत्रे      

मतदार ओळखपत्र

आधार कार्ड

चालक परवाना

पासपोर्ट

जमिनीची कागदपत्रे