जर तुम्ही अशा जागी राहिलात, जिथे हवा शुद्ध आहे, तर मग तुमचा पंचवीस ते तीस टक्के दम्याचा त्रास कमी होईल. एकदा का आपण बाह्य समस्या काढून टाकली, की मग आतली समस्या हाताळणे शक्य होते. ज्या गोष्टीने हा त्रास वाढतो, ती गोष्ट जर आपण काढून टाकली नाही आणि नुसतेच प्रयत्न करत राहिलो, उदाहरणार्थ जर तुम्ही खूप प्रदूषण असलेल्या जागी प्राणायाम केला, तर तुम्ही आणखी समस्येला आमंत्रण देत आहात.
प्रश्न : मला दम्याचा आणि सायनसचा त्रास आहे. ते माझ्या अध्यात्मिक साधनेमध्ये अडथळे आणत आहेत. मी काय करावे?
सद्गुरू : जर तुमचे शरीर समस्या बनले, तर तेच तुमच्या संपूर्ण जीवनाचे लक्ष वेधून घेईल. जेव्हा तुम्हाला दम्याचा अटॅक येतो आणि श्वास घेता येत नाही, तेव्हा इतर कुठलीच गोष्ट महत्त्वाची नसते, तुम्हाला फक्त श्वास घ्यायचा असतो. हेच कुठल्याही प्रकारच्या वेदनेच्या बाबतीत किंवा आजाराच्या बाबतीत खरे आहे. जर शरीराची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर ते तुमचे संपूर्ण लक्ष वेधून घेईल. सर्व काही त्याचीच काळजी घेण्यात खर्च होईल.
हे शरीर स्वस्थ ठेवणे हे फक्त त्याचे सौंदर्य जपण्याबाबत किंवा इतरांपुढे मिरवण्याबाबत नाही. हे फक्त यासाठी आहे की हे शरीर तुमच्या जीवनात अडथळा बनू नये. ते वर चढण्याची पायरी बनले पाहिजे. जर ते अडथळा बनले, तर ओलांडायला अत्यंत कठीण अडथळा होऊन बसेल. असे नाही की तुम्हाला दम्याचा त्रास असला तर तुम्ही अध्यात्मिक बनू शकत नाही, पण त्याला पुष्कळ काही लागते. त्याच वेळी, शरीर कुठल्या समस्या घेऊन येऊ शकते याची ही एक चांगली आठवण आहे. तर दमा तुमच्यासोबत असेपर्यंत, तुम्ही या शरीराचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे - आज नाही, तर उद्या ते तुम्हाला त्रास देणार आहे. एकदा का तुमच्या हे लक्षात आले, की मग त्याच्या पलीकडे जाण्याची इच्छा सुद्धा खूप मोठी होऊ लागते.
शहरामध्ये राहावे की बाहेर?
आपल्याला या दम्यावर नक्कीच उपाय हवा आहे. जर तुम्ही आश्रमात रहात असला, तर आम्ही अशा काही गोष्टी करू शकतो ज्याने तुम्ही काही महिन्यात ठीक होऊ शकता. पण जर तुम्ही शहरात रहात असलात, तर बहुतेक भारतीय शहरे म्हणजे मूर्तिमंत दमा आहेत. जर तुम्ही दिल्लीमध्ये राहत असाल, तर ही अशी एक जागा आहे जिथे तुम्ही तिथली हवा डोळ्याने बघू शकता! जर तुम्हाला आरोग्याची समस्या असेल, तर तुम्ही शहरात राहू नये. निदान शहराबाहेरच्या एखाद्या गावात जाऊन राहायची आता वेळ आली आहे. “अरे, पण तिथे मी काय करणार? माझ्या नोकरीचे काय होणार?” जर तुम्ही सकाळ संध्याकाळ खोकत असाल, तर अशी नोकरी घेऊन तरी काय करणार आहात? गावात राहून थोडे कमी पैसे घेऊन मोकळे श्वास घेता येणे, हे माझ्या मते जास्त चांगले आहे.
तुम्ही पाहाल, जर तुम्ही अशा जागी राहिलात, जिथे हवा शुद्ध आहे, तर मग तुमचा पंचवीस ते तीस टक्के दम्याचा त्रास कमी होईल. एकदा का आपण बाह्य समस्या काढून टाकली, की मग आतली समस्या हाताळणे शक्य होते. ज्या गोष्टीने हा त्रास वाढतो, ती गोष्ट जर आपण काढून टाकली नाही आणि नुसतेच प्रयत्न करत राहिलो, उदाहरणार्थ जर तुम्ही खूप प्रदूषण असलेल्या जागी प्राणायाम केला, तर तुम्ही आणखी समस्येला आमंत्रण देत आहात.
जर तुम्ही शहरापासून लांब गेलात, तर तुमचे शहर काही कोलमडणार नाही. म्हणून तुम्हाला शहराची काळजी करण्याची गरज नाही. पण तुमचा प्रॉब्लेम असा आहे, की तुम्ही एका शर्यतीत धावत आहात आणि तुम्हाला ती शर्यत सोडायची नाही. समजा इतर कुणी जिंकले तर? जर तुम्हाला दम्याचा त्रास असला, तर असेही इतर कुणीतरी शर्यत जिंकणार आहे! इतर काही झाले नाही, तरी निदान मोकळा श्वास तरी घेता आला पाहिजे. फक्त श्वास आणि उच्छ्वास - निदान एवढे तरी सुख मिळणे हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे. पण दुर्दैवाने, हे सगळ्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे - श्वास घेणे कठीण झाले आहे.
जे लाखो लोक शहरांमध्ये राहत आहेत, त्यांनी एका जागी एवढी दाटी एकमेकांच्या प्रेमापोटी केलेली नाही. ही फक्त हाव आहे. तिथे स्टॉक मार्केट आहे, इंडस्ट्री आहे, आणखी काहीतरी आहे. हे जग तुमच्याशिवायही चालू शकते. जर तुम्हाला शहरामध्ये श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर त्याच्या बाहेर पडणे चांगले आहे. “अरे, सद्गुरू काय बोलत आहेत? त्यांना माहीत तरी आहे का की आम्ही शहरामध्ये काय करत आहोत?” तुम्ही जगणे सोडून पुष्कळ गोष्टी करत आहात, एवढे तरी मला माहीत आहे.
अनेक वर्षांपूर्वी, जेव्हा आम्हाला भारतामध्ये ईशा योग केंद्र उभे करायचे होते, तेव्हा आम्ही संबंध दक्षिण भारतात जमीन शोधली. मग आम्ही ठरवले की हे कोइम्बतूरमध्ये व्हायला पाहिजे आणि सबंध कोईम्बतूरमध्ये शोधू लागलो. लोकांनी मला सर्व प्रकारच्या जागा दाखवल्या, त्यापैकी काही कोईम्बतूर शहराच्या आत होत्या. तिथे केंद्र उभे करणे खूप सोपे झाले असते, आणि ते शहराच्या आत असल्याने कितीतरी जास्त लोकप्रिय सुद्धा झाले असते. शेवटी जेव्हा मी वेल्लियंगिरी पर्वांतांकडे आकर्षित झालो आणि म्हणालो “इथेच करायचे,” तेव्हा लोक म्हणाले, “हा वेडेपणा आहे. या जागी कोण येणार आहे?” मी म्हणालो, “ते ठीक आहे पण आपल्याला ते इथेच उभे करायचे आहे.”
त्यांना वाटले की माझे डोके फिरले आहे आणि काही जण सोडून गेले. आता साहजिकच त्यांना काही करून परत यायचे आहे. तुम्ही तुमचे जीवन अशा ठिकाणी जगले पाहिजे जिथे ते तुमच्यासाठी उत्तमरित्या घडून येईल, तुम्हाला इतर कुणापेक्षा चांगले जगता येईल म्हणून किंवा इतर कुठे जास्त पैसे कमावता येतील म्हणून नाही. आपल्याला फक्त डोंगर आवडतात म्हणून काही आपण डोंगराच्या शिखरावर जाऊन नारळाचे झाड लावत नाही. नारळाचे झाड पायथ्याशी असते. पण बांबू वर वाढतो कारण प्रत्येक प्रकारचे जीवन तेव्हाच बहरते जेव्हा त्याला लागणारे वातावरणात तिथे उपस्थित असेल. मानवी जीवनासाठी ऑक्सिजनची गरज आहे, कार्बनची नाही. जर तुम्हाला हे समजले, तर तुम्ही याला ठीक करू शकता. जर तुम्ही बाह्य समस्या काढून टाकली, तर आतली समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला सहजपणे मदत करू शकतो.