‘आरजीपी’ लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार : परब

गोव्याचे प्रश्न दिल्लीत नेण्यात दोन्ही खासदार अपयशी ठरल्याची टीका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th May, 12:29 am
‘आरजीपी’ लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार : परब

पणजी : रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) येत्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी शनिवारी गोवा वेल्हा येथे आयोजित जाहीर मेळाव्यात केली.

गोव्यातील म्हादई, कोळसा आदींसारखे अनेक प्रश्न संसदेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यावर तेथे चर्चा होऊन तोडगा निघत नाही. गोव्यातील प्रश्न संसदेत मांडून ते सोडवण्यात दोन्ही खासदार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळेच गोमंतकीयांचे महत्त्वाचे विषय दिल्लीपर्यंत नेण्यासाठी लोकसभेच्या दोन्ही जागा लढवून त्या जिंकण्याचा निर्णय रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने घेतला आहे, असे मनोज परब म्हणाले.

लोकसभेचे दोन्ही खासदार विकासकामांत अपयशी ठरले आहेत. संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी खोला, तर श्रीपाद नाईक यांनी इब्रामपूर गाव दत्तक घेतले होते. पण ही दोन्ही गावे अजूनही विकासापासून वंचित आहेत. यासाठी केंद्राकडून पाच कोटींचा निधी मिळत असतानाही तो घेऊन या गावांचा विकास करणे या खासदारांना जमलेले नाही. तेथील अनेक मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहेत, असे त्यांनी सांगितले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात जिल्हा पंचायती, पालिका निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुका रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष लढवणार आहे, असे ते म्हणाले. काही मतदारसंघांतील गट समित्या नेमण्याचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून लोकसभेच्या दोन्ही जागांवरील उमेदवार निश्चित केले जातील, असेही परब यांनी नमूद केले.