गुजरातमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यास गोव्यात अटक

मुलीची सुटका : जुने गोवा पोलिसांची कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th May 2023, 12:19 am
गुजरातमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यास गोव्यात अटक

म्हापसा : गुजरात येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील संशयित आरोपी हरीष भाई बिल्वाल (रा. पंचवाडा दोहाड, गुजरात) याला बांबोळीतून अटक करुन पीडितेची सुटका करण्यात आली. जुने गोवा पोलिसांनी संशयिताला पकडून गरबदा गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले.

८ फेब्रुवारी रोजी हे अपहरण प्रकरण घडले होते. संशयित आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवले होते. या प्रकरणी तक्रार दाखल होताच गुजरात पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. संशयित आपले वेळोवेळी ठिकाण बदलत होता. देशातील काही राज्यांत तो राहिला होता.

संशयित जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत सांताक्रुझ येथे असल्याचे स्पष्ट होताच गुजरात पोलिसांसह तीन पथके तैनात करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सकाळी बांबोळी येथे संशयिताला पोलिसांनी पकडले व नंतर गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, गुजरातमधील काही भागात अल्पवयीन मुलींना पळवून त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याची परंपरा आहे. नंतर अशी प्रकरणे आपापसात कुटुंबामध्ये मिटवली जातात आणि बहुतेक प्रकरणांत लग्न स्वीकारले जाते. परंतु या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

हेही वाचा