फातोर्डा, कुंकळ्ळीत विजेचा लपंडाव

नागरिक त्रस्त : नावेलीत विजेचा दाब कमी जास्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th May 2023, 12:19 am
फातोर्डा, कुंकळ्ळीत विजेचा लपंडाव

मडगाव : आठवडाभरात फातोर्डा, कुंकळ्ळी, नावेलीसह आजूबाजूच्या परिसरात विजेचा दाब कमी-जास्त होण्याच्या प्रकारांत वाढ झालेली आहे. याशिवाय वीज दोन ते पाच मिनिटांसाठी खंडित होऊन पुन्हा येणे व जाणे असे प्रकार वाढलेले आहेत. या प्रकारांमुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची हानी होऊ शकत असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

फातोर्डा, कुंकळ्ळी तसेच नावेली मतदारसंघातील नागरिकांना सध्या कमी जास्त प्रमाणात वीज पुरवठा होत आहे. काहीवेळा काही सेकंदांसाठी तर काही मिनिटांसाठी वीज खंडित होत पुन्हा येते. वीज खंडित होऊन पुन्हा मोठ्या दाबाने आल्यास सुरू असलेली विजेची उपकरणे बंद पडण्याची समस्या उद्भवू शकते. याची दखल वीज खात्याने घेत तत्काळ या प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सध्या वातावरणातील उष्मा वाढलेला असल्याने या कालावधीत वातानुकूलित यंत्रणा, फॅन सुरू असतात ते बंद पडल्याची शक्यता आहे. याशिवाय वीज खंडित झाल्याने उष्णतेचाही मोठा त्रास सहन करावा लागतो. वीज खात्याकडून २१ मे रोजी दक्षिण गोव्यातील वीज खंडित करुन मान्सूनपूर्व कामे करण्यात आलेली आहेत. यानंतरही विजेच्या समस्या कायम असल्याने मान्सून आल्यानंतर विजेच्या समस्यांत वाढ होण्याची शक्यता नागरिकांना वाटत आहे.

सरदेसाईंनीही मांडला होता मुद्दा

गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेवेळी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनीही फातोर्डा मतदारसंघात सध्या वीज पुरवठा करण्यात येताना विजेचा दाब कमी जास्त होत आहे. याचा त्रास नागरिकांना होत असून याकडेही राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

सीसीसीएफकडूनही मुद्दा उपस्थित

कुंकळ्ळी सिव्हिल अँड कंझ्युमर फोरमने (सीसीसीएफ) कुंकळ्ळीतील वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्रार केलेली आहे. २६ मे रोजी दिवसभरात नऊवेळा वीज खंडित होण्याचे प्रकार घडले तर २७ रोजी पहाटेपासून सातवेळा वीज खंडित झाली. याप्रश्नी कुंकळ्ळीतील वीज अभियंत्यांशी चर्चा केली असता कुंकळ्ळीतील सबस्टेशनवरील यंत्रणेत बिघाड झाल्याने वीज खंडित होत असल्याचे कारण देण्यात आले.

नावेली मतदारसंघात काही दिवस वीज खंडित होणे व विजेचा दाब कमीजास्त होण्याचे प्रकार होत आहेत. उच्च दाबाच्या वीजवाहिनींचा प्रश्न असल्याकारणाने वीज खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सावर्डे फिडरवर काहीतरी समस्या असल्याने त्याठिकाणाहून वीज पुरवठा होणाऱ्या सर्वच ठिकाणी हा प्रश्न आहे. लवकरच ती समस्या सोडवण्यात येईल, असे आमदार

उल्हास तुयेकर यांनी सांगितले.

भूमिगत वाहिनीच्या प्रस्ताव मंजुरीनंतर तत्काळ निविदा

नावेलीतील भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ८७ कोटींचा खर्च येणार आहे. त्यासंदर्भातील फाईल गोवा डेव्हलपमेंट बोर्डाच्या बैठकीत मंजुरीसाठी घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत या फाईलला मंजुरी देण्याची मागणी केलेली असून मुख्यमंत्र्यांनीही भूमिगत वाहिन्यांसाठीचा प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आश्वासन दिलेले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर पुढील १५ दिवसांत या कामाची निविदा जारी करण्यात येईल, अशी माहिती आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.