आयपीएलच्या वर्चस्वाची आज लढाई

चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सशी सामना : अहमदाबादमध्ये लढत


27th May 2023, 10:27 pm
आयपीएलच्या वर्चस्वाची आज लढाई

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

अहमदाबाद : आयपीएल २०२३ चा अंतिम सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांनी आपापल्या घरी एकमेकांवर विजय मिळवला आहे, तर मागील हंगामात दोन्ही सामने गुजरातच्या बाजूने गेले होते.             

गुजरात आणि चेन्नई यांच्यातील हा पाचवा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे, जिथे चेन्नईने अद्याप विजयाची चव चाखलेली नाही. आता चेन्नई पाचव्यांदा किताब पटकावणार की गुजरात आपला किताब राखण्यात यशस्वी होणार हे रविवारीच ठरणार आहे.            

जडेजाविरुद्ध चालणार गिलची बॅट            

आयपीएलच्या या हंगामात तीन शतके झळकावणाऱ्या शुभमन गिलपासून रवींद्र जडेजाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जडेजा गिलला एकदाही बाद करू शकला नाही आणि गिलने सहा टी-२० डावांत ४८ चेंडूत १४२ च्या स्ट्राईक रेटने ६८ धावा केल्या आहेत.            

तसेच डेव्हिड मिलरचेही गेल्या १३ डावांत जडेजाविरुद्ध पारडे जड आहे. मिलरने टी-२० क्रिकेटमध्ये जडेजाच्या चेंडूवर १६८ च्या स्ट्राइक रेटने आणि ६८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मिलरने आतापर्यंत १३ डावांत जडेजाकडून ७२ चेंडूंचा सामना करत १२१ धावा केल्या आहेत. मात्र, या काळात जडेजाने त्याला दोनदा बाद केले आहे.            

हार्दिकसमोर जडेजाचे आव्हान            

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला चेन्नईचा अष्टपैलू जडेजाविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल. जडेजाने चार डावांत हार्दिकला दोनदा बाद केले आहे. हार्दिकनेही ११३ च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये पांड्याने जडेजाविरुद्ध फक्त नऊच्या सरासरीने १६ चेंडूत १८ धावा केल्या आहेत.            

शमी पुन्हा करणार कॉनवेची शिकार?            

चेन्नईचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने आयपीएल सामन्यांमध्ये तीन वेळा महम्मद शमीचा सामना केला आहे आणि तीनही वेळा शमीने कॉनवेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. महम्मद शमीनेच या मोसमातील पहिल्या सामन्यात आणि क्वालिफायर-१ मध्ये कॉनवेची विकेट घेतली होती. त्याचवेळी कॉनवेला ४२ च्या स्ट्राईक रेटने १२ चेंडूत केवळ ५ धावा करता आल्या.            

ऋतुराज आणि शमीत चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि गुजरातचा सलामीवीर महम्मद शमी यांच्यातही अंतिम सामन्यात लढत पाहायला मिळेल. आतापर्यंत आयपीएलच्या सात डावांमध्ये ऋतुराजने शमीविरुद्ध केवळ ७० च्या स्ट्राईक रेटने ६६ चेंडूत ४६ धावा केल्या आहेत. यादरम्यान शमीला एकदाही ऋतुराजची शिकार करता आलेली नाही.            

होऊ शकते लढत  राशिदचे धोनीला आव्हान            

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गुजरातचा लेगस्पिनर राशिद खानविरुद्ध आतापर्यंत सात टी-२० डाव खेळले आहेत. मात्र राशिदच्या फिरकीसमोर धोनीला ६९ च्या स्ट्राइक रेटने ३५ चेंडूत केवळ २४ धावाच करता आल्या आहेत. या काळात राशिदला धोनीला फक्त एकदाच बाद करता आले आहे.            

आयपीएल २०२३ मध्ये अहमदाबादमध्ये सर्वाधिक षटकार            

अहमदाबादच्या मैदानावर आयपीएलच्या या हंगामात एकूण ८ सामन्यांचे १६ डाव खेळले गेले आहेत आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या हंगामातील सर्व स्थळांमध्ये सर्वाधिक १४३ षटकार आहेत. तसेच चेन्नईने या मैदानावर आतापर्यंत तीन सामने खेळले असून तीनही वेळा गुजरातने त्यांना पराभूत केले आहे, तर गुजरातने नऊ पैकी सहा सामने जिंकले आहेत आणि तीन वेळा गमावले आहेत.