गवत कापताना गुरगुरला बिबटा, तीन बछड्यांसह बसला होता लपून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th May 2023, 12:25 am
गवत कापताना गुरगुरला बिबटा, तीन बछड्यांसह बसला होता लपून

फोंडा : शिरशिरे-बोरी येथे शुक्रवारी लक्ष्मण जोशी यांच्या घराजवळ लावलेल्या गवतात तीन बछड्यांसह बिबटा लपून बसल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी शिरशिरे येथे आले पण, तोपर्यंत बिबट्याने बछड्यांसह तिथून पळ काढला होता. सध्या खात्याचे कर्मचारी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. रात्री उशिरा बिबट्या पिलांना घेऊन जंगलात जाण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लक्ष्मण जोशी यांनी आपल्या घराच्या खालच्या बाजूने सुमारे १०० मीटर अंतरावर गवत लावले आहे. सकाळ, दुपार व संध्याकाळी गवत कापून गुरांना देण्याचे काम जोशी करीत असतात. गेल्या ३ दिवसांपासून गवत कापत असताना त्यांना वेगळ्या प्रकारची दुर्गंधी येत होती. परंतु शुक्रवारी सकाळी गवताची कापणी करीत असताना सुमारे अर्धा मीटर अंतरावर त्यांना बिबट्या गुरगुरत असल्याचे ऐकू आले. यासंबंधीची माहिती त्यांनी जवळच असलेल्या सूर्यकांत गावडे यांना दिली. गावडे यांनी गवताच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तेव्हा त्याठिकाणी तीन बछडे दिसून आले. त्यांनी त्वरित वन खात्याला याची माहिती दिली. माहिती मिळताच वन अधिकारी दीपक तांडेल व अन्य कर्मचाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली. बिबट्याचे बछडे असल्याने वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना संध्याकाळपर्यंत परिसरात तैनात करण्यात आले होते. रात्र झाल्यानंतर बिबट्या पिलांना घेऊन जंगलात जाण्याची प्रतीक्षा करीत होते. बछडे आणि बिबट्याला शोधण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली. पण, त्याचा फायदा झाला नाही.

सुदैवाने आपल्यावर बिबट्याने हल्ला केला नाही. अवघ्या अर्धा मीटर अंतरावर मी गेल्या दोन दिवसांपासून गवताची कापणी करीत होतो. परंतु शुक्रवारी गवत कापणी करीत असताना बिबट्या गुरगुरत असल्याचे आपण ऐकले. त्यानंतर वन खात्याला माहिती दिली. - लक्ष्मण जोशी

हेही वाचा