अंगावर काटा आणणारा ‘असुर २’चा फर्स्ट लूक


25th May 2023, 09:56 pm
अंगावर काटा आणणारा ‘असुर २’चा फर्स्ट लूक

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर तो क्षण आला आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. 'असुर' या लोकप्रिय हिंदी वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. शोच्या निर्मात्यांनीही त्याचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. 'असुर २' चा फर्स्ट लूक पाहून अंगावर काटा उभा राहील.
अर्शद वारसी आणि बरुण सोबती स्टारर वेब सीरिज 'असुर' २०२२ मध्ये रिलीज झाली हेती. सुरुवातीपासूनच त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मालिकेची कथा आणि स्टार्सच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. इतकंच नाही तर नंतर तिला सर्वोत्कृष्ट हिंदी मालिकांपैकी एक म्हणूनही ओळखले गेले. तेव्हापासून चाहते त्याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'असुर २' आणण्याची मागणी सोशल मीडियावर सातत्याने होत होती.
'असुर'मध्ये विज्ञान, धर्म आणि गुन्हेगारी यांच्यात अडकलेली अशी वेधक कथा दाखवण्यात आली होती. या सस्पेन्स थ्रिलर मालिकेत गुन्ह्यांसोबतच धर्म आणि पौराणिक कथा यांच्या अखंड मिश्रणाने प्रेक्षकांना वेड लावले. आता निर्माते 'असुर २' द्वारे हे एक पाऊल पुढे टाकणार आहेत. मालिकेचा फर्स्ट लूक जबरदस्त आहे. येथे तुम्हाला पात्रे अडचणीत सापडलेली दिसतील. एक क्षण असा येईल जेव्हा बरुण सोबती आणि अर्शद वारसी आमनेसामने असतील. अभिनेता विशेष बन्सलची व्यक्तिरेखा तुम्हाला घाबरवेल.

काय होती पहिल्या भागाची कथा?
'असुर' या वेबसीरिजची कथा सीबीआय अधिकारी धनंजय राजपूत (अर्शद वारसी), फॉरेन्सिक तज्ज्ञ निखिल (बरुण सोबती) आणि स्वत:ला 'असुर' समजणाऱ्या आणि त्यानुसार एकामागून एक खून करणाऱ्या पात्राची आहे. प्रत्येक हत्येमागे त्याचे स्वतःचे तर्कशास्त्र असते आणि तो ज्या पद्धतीने खून करतो, ते अंगावर शहारे आणणारे आहे. 'असुर'ची कथा धनंजय राजपूतच्या निलंबनाने संपली. दुसरीकडे, होत असलेल्या खुनामागे धनंजयचा हात असल्याचे निखिलला वाटत होते. तर प्रत्यक्षात असुर अजूनही मुक्तपणे फिरत आहे. आता ही कथा काय वळण घेते हे 'असुर २' मध्ये पाहायला मिळणार आहे.
'असुर २' आता जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. हा शो १ जूनपासून या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्याशिवाय 'असुर २' मध्ये अनुप्रिया गोएंका, रिद्धी डोगरा, मियां चेंग, गौरव अरोरा, विशेष बन्सल आणि एमी वाघ हे देखील दिसणार आहेत.